जयपूर- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. व्हाईटहाऊस मधून त्यांच्या निवडीची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यात त्यांचा अहमदाबाद दौराही ठेवण्यात आला आहे.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्ली प्रवासादरम्यान याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाईल.
डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.