चीनचा निर्णय, काही शहरात प्रवासबंदी लागू
बिजींग – कोरोना विषाणूंमुळे 25 जणांचा मृत्यु,तर 830 जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 29 प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले जात आहे. या विभागात 1 हजार 72 नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
25 पैकी 24 मृत्यू चीनच्या हुबेई प्रांतात झाले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चांद्र वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. चीनच्या 5 शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात आली आहे. थायलंडमध्ये तीन जणांना या विषाणूंची बाधा झाली होती, त्या पैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. कोरिया, अमेरिका आणि सिंगापूर इथं प्रत्येकी एका रुग्णाला विषाणू बाधा झाली आहे, तर व्हिएतनाम इथे दोन रुग्ण आढळले आहेत.
चीनमध्ये 9 हजार 507 रुग्णांपैकी 8 हजार 420 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर हजार 87 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवले आहे. दरम्यान, या समस्येला इतक्या लवकर आरोग्य आणीबाणी जाहीर करणे अगतिकता होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे समोर आले आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी करण्यात आली. या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळे ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली. यासंदर्भात दूतावासानं ट्विटर संदेशात दिलेल्या माहितीनुसार, तिला एम.ई.आर.एस.- सीओव्ही प्रकारच्या विषाणूची बाधा झाली असून, तो चीनमधल्या वुहान इथे पसरणारा कोरोनाचा प्रकार नाही.