गळका रांजण

एक आटपाट नगर होतं. बलादित्य नावाचा राजा तेथे राज्य करत होता. सुलक्षणा ही त्या राजाची एकुलती एक कन्या. उपवर झालेली. नाकीडोळी छान. रूपाची खाण. बुद्धीने हुशार. स्वभावाने चतुर. सुस्वभावी. सुलक्षणी. राजाला तिच्या विवाहाची काळजी लागलेली. दूरदूरच्या देशात तिच्या एवढा सुंदर, तिच्याहून बुद्धिमान, शूर पराक्रमी राजकुमार राजाच्या दृष्टीपथात नव्हता. राजाने काही राजकुमारांची नावे तिला सुचवली. पण राजकन्येने त्यांना नकार दिला. म्हणाली, मी माझं स्वयंवर ठेवीन. त्यात जो जिंकेल त्याला मी वरमाला घालीन.

पण स्वयंवराचा “पण’ काय असेल असे विचारल्यावरती म्हणाली, महाराज तीन दालनात जमिनीत अर्धवट पुरलेले तीन रांजण असतील. ते रांजण बुडाशी गळके असतील. जे राजकुमार स्वयंवराला तयार असतील त्यांनी ते रांजण भरून दाखवायचे.

राजकुमारी, पण गळके रांजण कसे भरतील? राजाने शंका बोलून दाखवली. तेच तर आपल्याला पहायचे आहे. जो ते रांजण भरून दाखवेल त्यालाच मी वरमाला घालीन.हा पण कोण कसा जिंकणार? आणि राजकुमारीचा विवाह कसा होणार? या चिंतेत राजा बुडून गेला. देशोदेशी दवंडी पिटवली गेली. केवळ राजपुत्रांनाच नव्हे तर सामान्य तरुणांनाही स्वयंवरात सहभागी होण्याची आणि स्वयंवर जिंकून राजकुमारीला वरण्याची अनुमती देण्यात आली. प्रजेलाही स्वयंवराला उपस्थित राहून राजकुमारीला आशीर्वाद देण्यासाठी आव्हान करण्यात आले. स्वयंवराचा दिवस उजाडला. स्वयंवराची तयारी झाली. राजवाड्यासमोर भलामोठा मंडप उभारण्यात आला होता. राज्याच्या दाहीदिशांनी राजवाड्याकडे प्रजेची रीघ लागली. मंडप गर्दीने भरून गेला.

राजा सिंहासनावर विराजमान झाला होता. सेवक त्यांच्यावर चवऱ्या ढाळीत होते. बाजूच्या एका आसनावर राणी विराजमान झाली होती. दुसऱ्या आसनावर राजकुमारी आसनस्थ झाली होती. तिचं सौंदर्य पाहून प्रजा दिपून गेली होती. प्रधान पुढे आले. त्यांनी प्रजेला आव्हान केले. म्हणाले, जनहो, आज इथे राजकुमारी सुलक्षणा यांचे स्वयंवर आयोजित केले आहे. बाजूच्या तीन दालनात तीन रांजण आहेत. निम्म्यापर्यंत ते रांजण मातीत गाडलेले आहेत. तिन्ही रांजण बुडाशी गळके आहेत. रांजणाच्या बाजूलाच तीन घागरी आहेत. जे कोणी स्वयंवराला तयार असतील त्यांनी पुढे यावे. ते रांजण भरून दाखवावे. रांजण भरल्यानंतर घटकाभराने तिन्ही रांजण तपासले जातील. ज्याचा रांजण काठोकाठ भरलेला असेल त्याला राजकुमारी वरमाला घालीन.

गळके रांजण कसे भरणार? भरले तरी घटकाभराने त्यातील पातळी कमी झालेली असणार? उपस्थित समुदायात बरीच कुजबुज झाली. कुणीही पुढे येताना दिसेना. गर्दीतून वाट काढीत एक राजकुमार पुढे आला. त्याने राजाला नजराणा देण्याच्या हेतूने जडजवाहीर, हिरेमाणके आणि सुवर्ण मोहरा त्याच्या रथात भरून आणल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ एक ऋषिपुत्र पुढे आला. अंगावर धोतर आणि खांद्यावर उपरणे. ऋषिकुलात पूजाअर्चेत गढून जाणारा. होमहवन करणारा. सुसंस्कारी. सारे वेद आणि उपनिषिदे मुखोद्‌गत असणारा. आपण स्वयंवर जिंकले की तेथे लगेच होम करायचा. त्यासाठी त्याने होमचे सर्व साहित्य, धूप सोबत आणला होता. राजा, राणी आणि उपस्थित मंत्रीगण स्वयंवरात सहभागी होण्यासाठी आणखी कोणी पुढे येतो का हे पाहत होते. पण कोणी पुढे येताना दिसत नव्हते. फक्‍त दोघेच पुढे होते. दोघांना रांजण भरण्यासाठी जाण्याची अनुमती देण्यात येणार होती. तेवढ्यात आणखी एक गरिब शेतकऱ्याचा मुलगा पुढे आला. म्हणाला, मलाही या स्वयंवरात सहभागी व्हायचं आहे.

दरबारातले मंत्रीगण आणि प्रजा अचंबित झाली. नक्कीच हा फाटका तरुण स्वयंवर जिंकणार अशी सगळ्यांची खात्री झाली. कारण राजपुत्रांना घागरी वाहण्याची सवय नसणार. आणि हा तरुण तर रोज घरोघरीचे रांजण भरून द्यायचा. झाले तिघांना रांजण भरण्यासाठी जाण्याची अनुमती देण्यात आली. तिघे तरुण आपापल्या दालनाकडे गेले. घागर उचलून कामाला लागले. गळके रांजण हे तरुण कसे भरणार? आणि भरले तरी घटकाभराने त्या रांजणातली पातळी कमी होणार. ज्याचे नशीब थोर त्याच्या रांजणाची पातळी सर्वात वर राहील आणि तो पण जिंकेल असे वाटले सगळ्यांना.

सर्वात आधी ऋषिपुत्र रांजण भरला असे सांगत सगळ्यांसमोर हजर झाला. थोड्या वेळात राजकुमार देखील हजर झाला. रांजण भरण्याचा सराव असणारा शेतकऱ्याचा मुलगा अजून का येईना? त्याचा रांजण जास्त गळत असेल असे सर्वांना वाटले. तेवढ्यात पाणी वाहून ओलाचिंब झालेला तो शेतकरी तरुण रांजण भरल्याचे सांगत पुढे आला.

घटकाभराचा वेळ जाऊ देण्यात आला. मग राजा, महाराणी, प्रधान, काही पंच आणि तिन्ही तरुण एकेक रांजण पाहू लागले. त्या गरीब तरुणाने पाण्याने रांजण भरला होता. एवढ्या वेळात त्यातील पाण्याची पातळी बरीच खाली गेली होती. दुसऱ्या दालनात गेल्यावर तिथे सुगंध दरवळत होता. काहीसा धूर सुद्धा दालनात पसरला होता. सगळ्यांनी रांजणात डोकावून पाहिले तर त्या रांजणात बराच धूर होता. पण तो फारच विरळ झाला होता. तिसऱ्या दालनाशी पोहचले तर तो रांजण सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरला होता. सगळे बाहेर आले.

ज्या राजपुत्राने सोन्याच्या मोहरांनी रांजण भरला होता. त्याच्या गळ्यात राजकुमारीने वरमाला घातली. प्रजेला आनंद वाटला. विवाहसोहळा पार पडला. पंचपक्वानाचे भोजन करून प्रजा घरोघरी परतली. आपले आयुष्य हे सुद्धा एक गळका रांजण आहे. तो कशाने भरायचा? हे ज्याला कळते तो सुखी होतो. त्या राजपुत्राने जरी सोन्याच्या मोहरांनी रांजण भरला होता तरी आयुष्याचा रांजण मात्र धन दौलतीने, संपत्तीने, ऐश्वर्याने भरायची गरज नसते. समाधानी माणसाला त्याच्या आयुष्याचा रांजण नेहमीच काठोकाठ भरलेला आहे याची अनुभूती येत असते.

आयुष्याचा रांजण नेहमी समाधानाने, परस्परांवरील प्रेमाने, जनसेवेने, आनंदाने, ज्ञानाने भरावा. ईश्वराच्या नाम स्मरण करून तो भरला तर आयुष्यात कधीही रितेपण जाणवत नाही. पण अनेकांना हे कळत नाही. आणि ते आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावण्यातच आयुष्य घालवतात. संपत्तीच्या, ऐश्वर्याच्या मागे धाव घेऊन आयुष्याचा रांजण कधीच भरत नाही. उलट आपण आयुष्यभर धावत आहोत तरी आपल्या आयुष्याचा रांजण भरत नाही ही चिंता त्यांचे काळीज पोखरत राहाते आणि माणसाला अधिक रितेपण जाणवत राहाते.

– विजय शेंडगे

Leave A Reply

Your email address will not be published.