साओ पावलो, (ब्राझिल) – ब्राझिलच्या अध्यक्षपदी लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत लुला यांनी विद्यमान अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांचा फार थोड्या फरकाने पराभव केला. लुला डी सिल्वा यांना 50.9 टक्के मते मिळाली तर बोल्सेनारो यांना 49.1 टक्के मते मिळाली.
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान कालच झाले. त्यानंतर तासाभरातच निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीतील चुरशीमुळे या निकालांबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती. बोल्सेनारो यांनी या निकासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
निवडणुकीतील मतदान प्रक्रियेदरम्यान काही गैरव्यवहार झाल्याचा आरोप बोल्सेनारो यांच्या गटाच्यावतीने सातत्याने करण्यात येत होता. मात्र तो दावा सिद्ध करता येऊ शकलेला नव्हता. आता निवडणुकीतील गैरव्यवहारांच्या या आरोपांमुळेच निकालाला बोल्सेनारो यांच्यावतीने आव्हान दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
लुला हे प्रखर डाव्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत. तर बोल्सेनारो हे कडव्या उजव्या विचारसरणीचे नेते होते. लुला हे ब्राझिलचे माजी अध्यक्ष आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना दोषी ठरवून तुरुंगात टाकण्यात आले होते.
मात्र न्यायाधीशांच्या पक्षपातीपणाचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरल्यामुळे लुला यांची तुरुंगातून सुटका झाली होती. 2018 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते उतरू शकले नव्हते. त्यामुळे बोल्सेनारो यांना अध्यक्ष होण्याची ससंधी मिळाली होती.