हिमांशू
“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’, अशा घोषणा सुमारे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी निवडणुकीच्या हंगामात दिल्या जात असत. सध्या आपण हरघडी इलेक्शन मोडमध्येच असतो. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामुळं परराज्यांतील विधानसभा निवडणुकांपासून पालिका निवडणुकांपर्यंत सर्वच आघाड्यांवर रस घेण्याची आपल्याला संधी असते. सोशल मीडियावरून आपापल्या आवडत्या नेत्यांची आणि पक्षांची तळी उचलण्याची अमर्याद संधीही आपल्याला मिळालीय. घोषणांसाठी घसे कोरडे करावे लागत नाहीत. सरकारचे आणि नागरिकांचेही प्राधान्यक्रम बदलले असल्यामुळं घोषणाही बदलल्यात. “सस्ती दारू महंगा तेल’ अशा घोषणांऐवजी आता “सस्ता डेटा, महंगा आटा’ अशी सोशल घोषणा दिली जाते.
सरकारच्या विरोधातील मंडळी जेव्हा डेटा स्वस्त आणि आटा महाग अशी तक्रार करतात, तेव्हा सरकारची बाजू हिरीरीनं मांडणारे सोशलवीर म्हणतात, की स्वस्त किंवा फुकट डेटा मिळतोय म्हणून तुम्हाला हे बोलता तरी येतंय. तेव्हा डेटा स्वस्त आहे, याबद्दल सरकारचे तुम्ही आभारच मानायला हवेत. सरकारविरोधक याला उत्तर देताना म्हणतात, तुम्हाला आटा मिळाला नाही तरी चालेल, कारण सरकारने तुम्हाला डेटा खाऊन जगायला शिकवलंय. हा सामना मोठा मनोरंजक असतो. आमच्यासारख्या मनोरंजनास इच्छुक व्यक्तींना तर असे संवाद वाचताना खूप मजा येते.
मध्यंतरी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी अनेकांनी चिनी बनावटीच्या मोबाइलवरूनच संदेश पाठवून मोठी गंमत आणली होती. आम्ही फक्त वाचणारे असून, सोशल मीडियावर प्रतिक्रिया चुकूनसुद्धा देत नाही. मनोरंजन एकतर्फीच असावं… नाटक-सिनेमासारखं. या भूमिकेचा महत्त्वाचा फायदा असा की, आम्हाला डेटा फारसा खर्च करावा लागत नाही. त्यामुळं डेटा स्वस्त असण्याचे फायदे, या विषयावरची चर्चाही आम्ही मनसोक्त एन्जॉय करतो. परंतु सरकारवर तोफ डागण्यासाठी विरोधकांची डेटा-आटा तुलनाही आता कुचकामी ठरणार आहे.
कारण डेटा आता दुप्पट महाग होणार आहे. कदाचित आटा स्वस्त वाटू लागेल. एअरटेल आणि आयडियाचा डेटा चाळीस टक्क्यांनी आणि जिओचा डेटा पन्नास टक्क्यांनी महागणार, या बातमीनं अनेक सोशलवीरांची झोप उडालीय. कारण झोप लागण्यासाठी डेटा हीच सर्वोत्कृष्ट अंगाई आहे, असं त्यांचं ठाम मत आहे. खरं तर स्पर्धेमुळं म्हणा किंवा इतर कारणांमुळं म्हणा, डेटा भारतातच सर्वाधिक स्वस्त आहे, अशी बातमी आम्ही सुमारे वर्षभरापूर्वी वाचल्याचं आठवतंय. परंतु अशा स्पर्धेमुळं प्रमुख कंपन्या कर्जात बुडाल्या, ग्राहकांना योग्य सेवा देणंही त्यांना शक्य राहिलं नाही, ही ताजी बातमी. अर्थातच आभासी जगताची सवय भारतीयांना लावण्यासाठी स्वस्त डेटा देणं अंगलट आल्याचा साक्षात्कार आता या कंपन्यांना झालाय. दुसरीकडे, सवयीचे गुलाम मात्र हादरलेत.
आम्ही मात्र सर्व बाजूंनी भाग्यवंत ठरलो आहोत. डेटावापर आणि सोशल मतप्रदर्शन या गोष्टी आम्ही फारशा सीरिअसली घेतल्या नसल्यामुळं डेटा महागला तरी आम्ही तो पोटापुरता खरेदी करू शकतो. प्रश्न आहे डेटा स्वस्त असल्यामुळं गल्लीबोळात तयार झालेल्या नवलेखकांचा आणि नवकवींचा. राजकीय भाष्यकार आणि अर्थतज्ज्ञ तर इतके झालेत, की आपला देश किमान सोशल विश्वगुरू निश्चित बनू शकेल. या बिचाऱ्यांना यापुढं आमचा छळ किंवा करमणूक करण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागेल. दुर्दैव…