कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक आपल्या घरापासून दूर कुठेतरी अडकले आहेत. देशात लॉकडाऊन असून प्रत्येक नागरिक घरी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच विदेशात असलेली नागरिकही आपल्या घरी परतले आहेत. मात्र सुदैवानं अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेला माझा मुलगा परिस्थिती बिघडायच्या आता परत आला होता असं म्हणत अभिनेता बॉबी देओल भावूक झाला.
बॉबीने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की,’आर्यमन हा उच्चशिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये होता. सध्या कोरोना विषाणूमुळे इटली, इराण, अमेरिका, स्पेन, जर्मनी, इंग्लडमधली परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. अमेरिकाही चीननंतर कोरोना विषाणूची केंद्रबिंदू ठरत चालली आहे. आर्यमन तिथे शिक्षणासाठी आहे. आम्ही कोरोना विषाणूचा फैलाव चीनबाहेर होण्याआधी न्यूयॉर्कला गेलो होतो. माझ्या कुटुंबीयांनी न्यूयॉर्कमधल्या सुट्ट्या छान एन्जॉय केल्या.’
तो पुढे म्हणाला, ‘भारतात परतल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की कोरोनाचा धोका हा अधिकच वाढत चालला आहे, अभ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये असलेल्या आर्यमनची आम्हाला जास्त काळजी वाटू लागली. आम्ही त्याला भारतात बोलावून घेतले. सुदैवानं तो ८ मार्चला भारतात परतला होता. तो भारतात वेळेत आला.’ माझा मुलगा आज माझ्या सोबत आहे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे यासाठी मी स्वत:ला सुदैवी मानतो असंही बॉबी म्हणाला.’