नगर -पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या सौभाग्यवती डॉ. नेहा अखिलेश कुमार सिंह यांना अलीकडेच नगर महापालिकेत आरोग्य विभागात अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून मानधनावर नोकरी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सध्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात पसार असलेला महापालिकेचा आरोग्याधिकारी अधिकारी डॉ. अनिल बोरगे याच्याच सहीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी नियुक्तीपत्र देण्याऐवजी आरोग्याधिकाऱ्यांनी थेट नियुक्तीपत्र देऊन नगर महापालिकेच्या आरोग्य विभागात एक नवा इतिहास रचला आहे. या नियुक्तीसंदर्भात महापालिकेच्या आस्थापना विभागाशी संपर्क केला असता, अशी थेट नियुक्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांना देताच येत नाही.
कोणतीही नियुक्ती केवळ आयुक्तांच्याच सहीने देता येते, अशी भूमिका स्पष्ट केली. डॉ. नेहा अखिलेश कुमार सिंह यांच्याकडे कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या दिवशी डॉ. नेहा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, त्याच दिवशी त्यांना नोकरीच्या ठिकाणाचाही आदेश देण्यात आला आहे. वास्तविक नियुक्तीपत्र देऊन त्या महापालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांना नोकरीचे ठिकाण देणे अपेक्षित आहे. तथापि, डॉ. नेहा यांना एन. यू. एच. एम. विभागांतर्गत बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीतील नोकरी नियुक्तीपत्रासोबतच दिली.
नोकरीचे ठिकाण देताना डॉ. बोरगे याने त्याच दिवशी दिलेल्या नेमणूक पत्राचा संदर्भ दिला आहे. अशी “अति’तत्काळ सेवा देणाऱ्या डॉ. बोरगे याच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. दुपारी बारा ते दुपारी चार, या वेळेतील कामकाजाची जबाबदारी डॉ. नेहा यांच्याकडे देण्यात आलेली आहे. डॉ. नेहा यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात 5 जूनला भरती प्रक्रिया घेण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 8 जूनला नियुक्तीपत्र देतानाच त्यात पुढील सात दिवसांत महापालिकेच्या आस्थापनेच्या अटी व शर्ती पूर्ण कराव्यात, असेही म्हटले आहे.
त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. अटी व शर्तीनुसार करारनामा, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह आदेश प्राप्त होताच सात दिवसांत वैद्यकीय आरोग्याधिकारी तथा सदस्य सचिव शहर आरोग्य सोसायटी यांच्याकडे अहवाल सादर करावा, असे स्पष्ट केले होते.
त्यामुळे डॉ. नेहा यांना नोकरीचे ठिकाण ही कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील आठ दिवसांनी देण्यात येईल, असे आदेशातच स्पष्ट करण्यात आलेले आहे. असे असताना वैद्यकीय आरोग्य आधिकाऱ्यांनी स्वत:च्याच आदेशाकडे कानाडोळा करुन त्याच दिवशी नेमणुकीच्या ठिकाणाचाही आदेश देत एक नवा इतिहास घडविल्याचे स्पष्ट होते.