कोलंबो – वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल यांच्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट, श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आणि पाकिस्तानचा सरफराज अहमद यांनीसुध्दा लंका प्रीमियर लीग (एलपीएल) स्पर्धेतून माघार घेतली आहे.
गेल आणि प्लंकेट यांनी आपण खेळणार नसल्याची माहिती कॅन्डी टस्कर्सच्या टीमला दिली आहे. त्यानंतर कँडी टस्कर्स टीम मॅनेजमेंटने फेसबुक पोस्टद्वारे गेल आणि प्लंकेट यांनी स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, गेल आणि प्लंकेटच्या जागी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
कॅन्डी टस्कर्सच्या टीममधून भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल खेळणार आहे. तर स्थानिक खेळाडू म्हणून कुसल परेरा, कुसल मेंडिस आणि नुवान प्रदीप यांचा देखील समावेश आहे. गेल आणि प्लंकेट यांच्या एक दिवस आधी पाकिस्तानचा सरफराज अहमद यानेही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सरफराज अहमद गॉल ग्लेडिएटर्स टीमचा कर्णधार होता.
गेलने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. तर मलिंगाने आपण मार्चपासून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नसून मैदानात सरावदेखील केलेला नाही. अशा परिस्थितीत चांगली कामगिरी आणि संघाचं नेतृत्व करणं अवघडं असल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, लंका प्रीमियर लीग (एलपीएल) स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत जाफना स्टॅलियन्स, दाम्बुला हॉक्स, कॅन्डी टस्कर्स, कोलंबो किंग्स आणि गॉल ग्लेडिएटर्स असे एकूण 5 संघ खेळणार आहेत.