नवी दिल्ली – देशभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती आजपासून (2 डिसेंबर) लागू झाल्या आहेत.
किंमती वाढल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत 644 रुपयांवर गेली आहे. 1 डिसेंबर रोजीच तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचे दर वाढविले होते. 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत 55 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
यापूर्वी जुलैमध्ये वाढल्या होत्या 14 किलो सिलिंडरच्या किंमती
यापूर्वी जुलैमध्ये 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. जुलैमध्ये 4 रुपयांनी किंमतीत वाढ करण्यात आली. तर जूनमध्ये दिल्लीमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर 11.50 रुपयांनी महागले होते, तसेच मे मध्ये ते 162.50 रुपयांनी स्वस्त झाले होते.
व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढली –
डिसेंबर मध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 55 रुपयांची वाढ झाली आहे. या सिलिंडरचा दर येथे 1296 रुपये आहे. कोलकाता आणि मुंबईतही 55 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर या दोन शहरांत नवीन दर अनुक्रमे 1351 आणि 1244 रुपये आहेत.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती कशा ठरविल्या जातात
एलपीजी सिलिंडरच्या किंमती सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दर आणि परकीय चलन विनिमय दरानुसार निश्चित केल्या जातात. याच कारणास्तव, दरमहा एलपीजी सिलिंडरची अनुदानाची रक्कमही बदलते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक अनुदान देते आणि दर खाली आल्यावर अनुदान कमी केले जाते. कराच्या नियमांनुसार, एलपीजीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंधनाच्या बाजारभावानुसार मोजला जातो.
एलपीजी किंमत कोठे तपासायची
स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.