दि. 10 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू; ग्राहकांना फटका
पुणे – रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणात रेपोदर 5.15 टक्के या पातळीवर कायम ठेवूनही स्टेट बॅंकेने भांडवल सुलभता वाढल्यामुळे ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात शुक्रवारी जाहीर केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी दि. 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.
यामुळे ग्राहकांना त्यांच्या ठेवीवरील व्याजदरात घट सहन करावी लागणार आहे. स्टेट बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपयांपर्यंतच्या विविध काल मर्यादेच्या ठेवीवरील व्याजदर 0.10 ते 0.50 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. तर, 2 कोटी रुपयांवरील विविध काल मर्यादांच्या ठेवीवरील व्याजदर 0.25 टक्के ते 0. 50 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना कमी केलेल्या व्याजदरावर आणखी अर्धा टक्के व्याज जास्त मिळण्याची सुविधा असते. या व्याजदर कपातीला 7 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींना अपवाद करण्यात आले आहे.
स्टेट बॅंकेच्या नव्या निर्णयानुसार, 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवर साडेचार टक्के, 46 दिवस ते 179 दिवसांच्या ठेवीवर 5 टक्के, 180 ते 210 दिवसांच्या ठेवीवर साडेपाच टक्के, 211 ते 1 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर साडेपाच टक्के, 1 ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर 6 टक्के, 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर 6 टक्के, 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर 6 टक्के, 5 ते 10 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर 6 टक्के व्याज मिळणार आहे. मात्र, ज्येष्ठांना या व्याजदराच्या अर्धा टक्के जास्त व्याज मिळते.