कच्च्या तेलाचे दर कमी करावेत; भारताचे तेल उत्पादक देशांना आवाहन

अन्यथा भारताच्या कमी झालेल्या विकास दराचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

नवी दिल्ली – सध्या कच्च्या तेलाचे दर 85 डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे भारतासारख्या मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या विकास दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे तेल उत्पादक देशांनी या तेलाचे दर कमी करावेत. अन्यथा याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असे भारताने म्हटले आहे.

भारत कच्च्या तेलाचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उपयोग करणारा देश आहे. करोनामुळे भारताबरोबरच इतर देशांच्या आर्थिक व्यवस्थांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जर कच्चे तेल महागले तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये सध्या डिझेल, पेट्रोलचे दर विक्रमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे.

जर तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाच्या किमती एकतर्फी वाढवत ठेवल्या तर विविध देश पर्यायी इंधनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी होईल. याचा तेल उत्पादक देशावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असेही भारतातील तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तेलाच्या किमती तेल उत्पादक देश आणि तेल वापरणारे देश यांच्या दरम्यान संतुलित राहण्याची गरज आहे. मात्र सध्या तेल उत्पादक देश अतिरिक्त नफा काढून घेत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात तेलाच्या किमती 19 डॉलर. त्या आता 85 डॉलरवर गेल्या आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी या अगोदर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार इत्यादी देशांना कच्च्या तेलाचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर पेक्षा जास्त असू नये अशी भारताची भूमिका आहे. मात्र गेल्या एक महिन्यांमध्ये तेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर भारताने अनेक व्यासपीठावर चिंता व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.