उंब्रज – प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाने महिलेवर चाकूने वार करून स्वत:च्या पोटातही चाकू खुपसून घेतल्याची खळबळजनक घटना 24 जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चरेगाव येथे घडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उंब्रज पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.
याप्रकरणी जखमी महिला अनिता शंकर उरभगत (वय 45 रा. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर सध्या रा. चरेगाव, ता. कराड) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून शिवाजी यशवंत (भंडगे रा. मंगेवाडी, ता. सांगोला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरभगत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मूळच्या सांगोला येथील अनिता उरभगत सध्या चरेगाव येथे वास्तव्यास आहेत. संशयित शिवाजी भंडगे ऊस टोळीचा मुकादम असून जखमी अनिता त्याच्या ऊस टोळीत कामास होत्या व त्यांचे आठ वर्षापासून प्रेमसंबंध होते. 24 जुलै रोजी रात्री त्या शेजारील घरात टीव्ही पाहत होत्या. रात्री नऊच्या सुमारास घरी परतत असताना शिवाजी भंडगे याने हाक मारली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून अनिता घरात निघून गेल्या. त्यानंतर शिवाजी भंडगे हा तेथे आला व त्याने “आपले आठ वर्षापासून प्रेमसंबंध आहेत.
ते तू बंद का केलेस व मला घरात का राहू देत नाहीस,’ अशी विचारणा करत चिडून जावून शिवीगाळ केली व अनिता यांच्या डोक्यावर, कानावर, खांद्यावर व हातावर वार केले. यामध्ये अनिता गंभीर जखमी झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी शेजारी त्यांच्या घराकडे धावत आले. त्यानंतर शिवाजी भंडगे याने स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेतल्याने तोही गंभीर जखमी झाला. ही घटना शेजारील लोकांनी पोलिसांना कळवली. दोघांनाही उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास हवालदार लक्ष्मण जगधने करत आहेत.