-->

लव्ह जिहाद: मुख्यमंत्री गेहलोत यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘देशाची विभागणी करण्यासाठी…’

जयपुर – धार्मिक आधारावर देशाची विभागणी करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी भाजपने लव्ह जिहाद हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठीच त्यांनी हा शब्द शोधून काढला आहे असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

विवाह हा पुर्णपणे वैयक्तीक मामला आहे. त्यावर कायद्याने बंधन आणणे हे पुर्णत: घटना विरोधी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. प्रेमात जिहादला कोणत्याही स्वरूपाचे स्थान नसते असे गहलोत यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.

भाजपने देशात आता असे वातावरण निर्माण केले आहे की दोन सज्ञान व्यक्तींना विवाह करायचा असेल तर आता त्यांनी सरकारची अनुमती घेतली पाहिजे. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खासगी निर्णय आहे, त्याच्यावर आता ते निर्बंध आणू इच्छित आहेत. लोकांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा हा आणखी एक प्रकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहादला विरोध करण्यासाठी भाजप शासित राज्यांमध्ये स्वतंत्र कायदे करण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. त्या संबंधात गेहलोत यांनी ही विधाने केली आहेत. देशातील धार्मिक विद्वेषाला खतपाणी घालण्याचाच प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

उत्तरप्रदेश, हरियाना आणि मध्यप्रदेशात लव्ह जिहाद स्वरूपाच्या विवाहांना बंदी घालणारे कायदे केले जाणार आहेत. तसा निर्धार तेथील सत्ताधाऱ्यांनी बोलून दाखवला आहे. विवाहाच्या नावाखाली हिंदु मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरीत करण्याचा प्रयत्न म्हणजे लव्ह जिहाद असे संबोधले जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.