अभिवादन: प्रेम, क्षमा, शांती, विश्‍वासाचा संदेश

सत्यवान स ुरळकर

परमेश्‍वराच्या पुत्राला सुळावर चढविले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे. स्वतः कोणतेही पाप न करता, कोणतीही चूक न करता देवपुत्राला या भूतलावरील अज्ञानी माणसांनी सुळावर चढविले. पण हा गुड फ्रायडे कसा? याचे उत्तर बायबलमध्ये नवा करारात सापडते. मृत्यूवर विजय मिळवून येशू पुनरुत्थानित झाला म्हणून शुक्रवारच्या या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. या दिवशी लोकांमध्ये प्रेम आणि विश्‍वास जागृत करणारे प्रभू येशू ख्रिस्तांची प्रार्थना केली जाते. गुड फ्रायडे या दिवशी प्रेम, सत्य आणि विश्‍वास या मार्गावर जाण्याची लोक शपथ घेतात.

मानवता विसरून लोक अमानुष कृत्ये करू लागतात, जगात पाप वाढते, तेव्हा एखादा दिव्यपुरुष या भूतलावर प्रकट झाला आहे. अंधकार युगातून मानवाला बाहेर काढण्यासाठी परमेश्‍वराचा पुत्र येशू यांचा जन्म झाला. त्यांच्या येण्याने या पृथ्वीवर एका नव्या युगाची सुरुवात झाली. लोकांमध्ये प्रेम व विश्‍वास राहिलेलाच नव्हता. अशावेळी पृथ्वीतलावर येशूने प्रेमाचा अथांग सागर निर्माण करून मानवाला प्रकाशाची वाट दाखविली.

“गुड फ्रायडे’च्या आधी चाळीस दिवस ख्रिस्ती बांधव उपवास करतात, “गुड फ्रायडे’चा दिवस हा एक्‍केचाळीसावा असतो. हा दिवस शांततापूर्ण वातावरणात आणि प्रार्थनेमध्ये घालवला जातो.

प्रभू येशू ख्रिस्त गुरुवारी रात्री आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे जेवण (लास्ट सपर) करत होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी आपणाला क्रुसावर चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले होते. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी प्रभू येशू यांना अनेक प्रकारच्या यातना देऊन सुळावर चढविण्यात आले. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी वेदना सहन करून आत्मबलिदान दिले. ज्यावेळी भूतलावरील लोकांनी येशूंना सुळावर चढविले. त्यावेळीही प्रभू येशूंनी क्षमा, शांती, प्रेम आणि विश्‍वासाचाच संदेश दिला. स्वतःला वेदना होत असूनही ते प्रभूकडे या सर्वांना क्षमा करण्याचे सांगतात. त्यामुळे एखाद्याने काही चूक केली असल्यास त्यास या दिवशी क्षमा करावी.

कोणतीही चूक, कोणतेही पाप न केलेल्या परमेश्‍वराच्या पुत्राला सुळावर चढविले, मग हा गुड फ्रायडे कसा? असा आपणास प्रश्‍न पडतो. याचे उत्तर बायबलमध्येच सापडते. मृत्यूवर विजय मिळवून येशू पुनरुत्थानित झाला म्हणून शुक्रवारच्या या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. मृत्युदंड दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी त्यांचे पुनरुत्थान म्हणजे असलेल्या रूपात आणि देहात पुनर्जीवित झाले. म्हणून त्या दिवसाला “इस्टर संडे’ असे म्हटले जाते. याच दिवशी येशूने परत जन्म घेतला म्हणून हा दिवस ख्रिसमससारखाच पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो.

मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्या कबरीजवळ गेले तेव्हा त्यांना तेथे त्यांची त्यागाची वस्त्रे आढळली. तेव्हा तेथे उभ्या असलेल्या एका देवदूताने त्यांना विचारले की, तुम्ही येशूला शोधत आहात का? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यात का करता? तो तुमच्या आधीच गालील गावामध्ये त्याने मृत्यूपूर्वी सांगितल्यानुसार गेलेला आहे.

येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असलेला संत थॉमस याने येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाविषयी संशय घेतल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. पुनरुत्थानानंतर येशू त्यांच्या शिष्यांना भेटले, त्यावेळी तेथे इतर शिष्यांसोबत थॉमस नव्हता. इतर शिष्यांनी थॉमसला येशूंनी त्यांना दर्शन दिल्याचे सांगितले. त्यावेळी मी येशूंना प्रत्यक्ष पाहिले तरच त्यांच्या जिवंत असण्यावर विश्‍वास ठेवणार, असे थॉमस म्हणाला. त्यानंतर एकदा सर्व शिष्यांसह थॉमस एका खोलीत प्रार्थना करीत होते. त्यावेळी प्रभू येशू तेथे प्रकट झाले. प्रभू येशू त्यांना म्हणाले, “तुम्हास शांती असो.’ प्रभू येशूंनी थॉमसला जवळ बोलावून आपल्या छातीमध्ये ज्याठिकाणी रोमन शिपायाने भाला भोसकला होता, तेथे त्याचे बोट लावले व विचारले, आतातरी विश्‍वास ठेवतोस का? त्यावर थॉमस म्हणाला, “माझा प्रभू, माझा देव.’ माणसाच्या संशयी प्रवृत्तीला ओळखून येशूने थॉमसला म्हटले, “आता तू पाहिले म्हणून विश्‍वास ठेवला आहे; परंतु जे न पाहता विश्‍वास ठेवतात ते धन्य आहेत.’

हा शुक्रवार म्हणजे सत्याचा असत्यावरील विजय, प्रेमाचा द्वेषावरील विजय आहे. कारण क्रुसखांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना या दिव्य परमेश्‍वर पुत्राने हे देवा, यांना क्षमा कर. कारण ते काय करतात त्यांना कळत नाही’ असे म्हटले होते. त्याचे क्षमाशील विचार यावेळी जागृत होते.

आज सुशिक्षित जगात पुन्हा पापाने डोके वर काढले आहे. दहशतवाद, खून, भ्रष्टाचार, गरीब दुबळ्यांवर होणारा अन्याय, कामगारांचे होणारे शोषण यांवर पुन्हा येशूंच्या विचारांची फुंकर मारणे गरजेचे आहे. येशूंनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानेच जग पापातून मुक्‍त होऊ शकेल. आज जगाला मानवतेचा धडा शिकवण्यासाठी येशूंच्या विचारांची गरज आहे. सर्व प्राणिमात्रांवर भूतदया दाखविण्याचा संदेश सर्वांनी अंगीकारला पाहिजे.

तुमच्याविषयी एखाद्याच्या मनात द्वेष असेल अशांनाही तुम्ही क्षमा करून तुमच्या मृदू संभाषणाने त्यांना आपलेसे करा, या येशूंच्या संदेशाची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. येशूने त्याचे संपूर्ण जीवन मानवाला जीवनाचे खरे ध्येय समजावून सांगण्यात घालविले. ज्या इस्रायलात जेरुसलेम येथे येशूंचा जन्म झाला तेथील धर्मग्रंथात न्याय आणि शिक्षेबद्दल असे सांगितले होते की, कुणी कोणाचा डोळा फोडला तर त्याचा डोळा फोडण्यात यावा. कुणी कोणाचा हात तोडला असेल तर त्याचा हात तोडण्यात यावा. परंतु येशू ख्रिस्ताने मात्र आपल्या अनुयायास सांगितले, दुष्टाला अडवू नका, ते करतात तसे तुम्ही करू नका. दुसरे तुमचा राग करतात तर त्यांना तुम्ही प्रेमाने जिंका. दुसरा तुम्हाला दुःख देतो म्हणून तुम्हीही त्याला दुःख देत असला तर तुमच्यात आणि पापी लोकांत काय फरक राहिला.

येशू म्हटले तुम्ही शत्रूवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रीती करा, हा जगावेगळा सल्ला कुणालाही पाळायला कठीणच आहे. मात्र, तरीही तुम्ही प्रेमाने शत्रूला जिंकू शकता, रागाला हरवू शकता, येशूंच्या संदेशाचे पालन करून हे जग पापमुक्‍त करू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.