प्रेमसंबंधातून सराईताचा कोंढव्यात खून

खून झालेल्या व्यक्‍तीवर चोरी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे

 

पुणे – भवानी पेठेतील सराईताचा कोंढव्यात खून करण्यात आला. दूरचित्रवाणीसाठी लागणारे डिश अँटिना दुरुस्तीचे काम तो करायचा. अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

खुनाचा हा प्रकार प्रेमसंबंधातून घडला असल्याची शक्‍यता कोंढवा पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्‍तीवर खडक पोलीस ठाण्यात चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. याबरोबरच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता.

अजय दादू खुडे (रा. साईनाथ नगर, मुंढवा) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी नीतेश टपके यांनी फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील ब्रम्हा ऍव्हेन्यू सोसायटीच्या पुढे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी त्याच्याकडील आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रांवरून शोध घेतल्यानंतर मृतव्यक्‍ती ही अजय खुडे असल्याची माहिती मिळाली. चेहरा, छाती व पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.