पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर करुन ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून बालाजीनगर परिसरातील दोन मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष, ध्वनिवर्धक पुरवठादार आणि शिवतीर्थ मंडळाचे अध्यक्ष यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी बबलू भिसे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम २२३, २८५, २८९, २९२, २९३ सह पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ सह ध्वनीप्रदूषण विनियमन, नियंत्रण २००० च्या कलमांवन्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ, शिवतीर्थ मंडळ आहे. १७ सप्टेंबर रोजी दोन्ही मंडळांकडून मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही मंडळांनी कोणतीही परवानगी न घेता उच्चक्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर केला.
ध्वनिप्रदूषणाबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्याने रहिवाशांना त्रास झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी याबाबत दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजाविली. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. पोलीस कर्मचारी डी. व्ही. धोत्रे आणि एच. सी. राऊत तपास करत आहेत.
“ती’ मंडळेही रडारवर
लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर केला, तसेच लेझर झोतांचा वापर केला. पोलीस आयुक्तांचा आदेश अनेक मंडळांनी तो धुडकाला होता. आता या मंडळांवर एक-एक करुन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.