संस्कृतीच्या खुणा: कमळाचे फूल

अरुण गोखले
भारतीय संस्कृतीतील मानाचे प्रतीक म्हणजेच कमळाचे फूल. या कमळाच्या फुलाला फार मोठे महत्त्व आहे. तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रीय फुलाचा सन्मानही याच फुलास देण्यात आलेला आहे. या फुलास संस्कृत भाषेत पद्म, मराठी भाषेत कमळ, हिंदी भाषेत कमल, तर इंग्रजी भाषेत लोटस्‌ म्हणून संबोधले जाते. कमळाची उत्पती ही चिखलात, दलदलीत होते. तरी सुद्धा हे एक अत्यंत सुंदर देखणे आणि सुगंधित असे फूल असून ते धनलक्ष्मीदात्या श्रीमहालक्ष्मीचे निवास स्थान आहे. त्यावरूनच तिचे “कमल निवासिनी श्रीमहालक्ष्मीदेवी’ असे नाव पडलेले आहे. या फुलाचा रंग मोहक असून त्याच्या पाकळ्यांचा मुलायम स्पर्श हा सुखावणारा आहे. लहान मोठ्या कमलपुष्पांनी फुललेल्या तलावाची शोभा आणि तिथले सुगंधित वातावरण हे खरोखरच चित्ताकर्षक व अवर्णनीयच असते. स्त्री सौंदर्याचे वर्णन करताना या फुलाची अनेकदा उपमा दिली जाते.

ईश्‍वराच्या अनेक अवयवांना या कमलपुष्पाची उपमा देण्यात आलेली आहे. त्याच्याबरोबरच्या रूप लावण्य तुलनेनेच कमलनयना, कमलवदना, कमलाकरा, कमलप्रिया अशी अनेक नावे त्या भगवंतास दिल्याची आपल्या पोथीपुराणात नोंद आहे. कमळ हे शतपत्र आहे, असेच ते सहस्रपत्र म्हणजेच शंभर किंवा हजार पाकळ्याचे असते, असाही उल्लेख वाचायला मिळतो. या कमल पुष्पाकडून घेण्यासारखा एक गुण आहे, तो म्हणजे त्याची अलिप्तता. कमळ पाण्यात, चिखलात, दलदलीत जन्मते, पाण्यात राहते, चिखलात वाढते पण त्याला मात्र त्या पाण्याचा किंवा चिखलाचा जरा सुद्धा स्पर्श नसतो. कमळाच्या पानावरही पाण्याचा थेंब जसा टिकून राहत नाही त्याप्रमाणे भक्‍ताने कोणत्याही वस्तू, वृत्ती यातून पूर्णत: अलिप्त राहावे हिच कमळाची आपल्याला शिकवण आहे.

या कमळाच्या फुलाचा दाखला देत रामकृष्ण परमहंस नेहमी हाच जीवन संदेश देतात की कमळ जसे पाय रोवून चिखलात उभे राहते. सूर्याकडे तोंड करून ते स्व विकासाच्या साधनेत रंगून जाते. आणि जसा का सूर्योदय होतो तशी कमलपुष्पे फुलतात. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा वाईटातूनही चांगले तेच घेऊन स्वत:च्या जीवनाचा पूर्णत्वाने विकास करून घ्या. सद्‌गुणांनी जीवन सुगंधीत करा. मनातील अनन्य शरणांगत भावानी आपले जीवनपुष्प त्या ईश्‍वराच्या चरणी समर्पण करावे, हेच कमळ आपल्याला शिकवीत असते. आपली भारतीय संस्कृती ही सुद्धा सहस्रपत्रांच्या कमळादल पाकळ्याच्या सारखीच म्हणजेच विविध जाती धर्म, पंथ, वंश, आणि समाज यांच्या वैविध्यतेने नटलेली आहे. तरीही तिच्यात एकात्मतेचा सुगंध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.