पुणेः पालकपंत्री पदाबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर काल रात्री महायती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत पुणे जिल्ह्यातील तीन आमदारांची पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. पर्वती विधानसभेच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना देखील सहपालक मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात एकूण २१ आमदार आहेत. यापैकी ८ आमदार हे पुणे शहरात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळाले आहे. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगलीचे पालक मंत्री करण्यात आले आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे राहिलेले आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरचे सहपालकमंत्री पद असणार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर आहेत. यापूर्वी कोल्हापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राहिलेले होते. आता हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बीडचे पालकत्व अजित दादांकडे
गेल्या काही महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळमुळ किती खोलवर रुतलेली आहेत, हे सर्व राज्यसमोर आले. यानंतर वाल्मीक कराडला पोलिसांनी अटक केली. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मुंडेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. तसेच मुंडेंना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये, अशी देखील मागणी करण्यात येत होते. मंत्री धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पत्ता कट करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे. एका अर्थाने बीडचे पालकमंत्री पद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आले आहे.