जीएसटी पावत्यांवर एप्रिलपासून लॉटरी

जीएसटी गळती थांबणार : बक्षिसाची रक्‍कम 1 कोटीपर्यंत

पुणे – व्यापारी किंवा उत्पादकांनी ग्राहकाला वस्तू किंवा सेवा विकल्यानंतर दिलेल्या पावतीवर (इनव्हॉइस) जीएसटी क्रमांक असतो. एप्रिलपासून प्रत्येक महिन्याला या पावती क्रमांकाचे लॉटरी काढली जाणार आहे.

यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या महिन्यात अशी लॉटरी काढण्याबाबत सरकार विचार करीत होते. प्रत्येक खरेदीवेळी ग्राहकाने अधिकृत पावती घ्यावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जीएसटी टाळण्याचे प्रकार कमी होतील, असे कर विभागाला वाटते.

या सर्व क्रमांकातून राष्ट्रीय पातळीवर एक मोठे बक्षीस जाहीर केले जाईल. त्यानंतर राज्यागणिक दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार आहे. ही बक्षिसाची रक्‍कम 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत असू शकते असे गेल्या महिन्यामध्ये अप्रत्यक्ष कर मंडळाच्या एका सदस्याने सांगितले होते. ग्राहकांनी त्यांच्या पावत्याचे स्कॅनिंग करून ते मोबाइलवरून अपलोड केले जाणे अपेक्षित आहे.

मोबाइल ऍप या महिन्यात उपलब्ध केले जाणार आहे. पावती कितीही रकमेची असली तरी ती अपलोड करता येऊ देऊ शकणार आहे. कर विभागाने या संदर्भातील तपशीलवार प्रस्ताव अगोदरच तयार केला असून या प्रस्तावावर जीएसटी परिषद 14 मार्च रोजी शिक्‍कामोर्तब करण्याची अपेक्षा आहे. लॉटरीतील रक्‍कम ग्राहक कल्याण निधीमधून जाणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.