लोणावळा -लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि. 28) काढण्यात येणार आहे. नगर परिषद कार्यालयात चौथ्या मजल्यावरील खुल्या सभागृहात दुपारी 12 वाजता ही सोडत होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार आहे. यासाठी समर्पित आयोगाच्या शिफारशी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसारच ओबीसींची सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे. लोणावळा नगर परिषदेसाठी ओबीसींसाठी 10.2 टक्के इतके आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार एकूण 3 जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. यातील दोन जागा या महिला ओबीसींसाठी तर एक जागा सर्वसाधारण ओबीसीसाठी आरक्षित असण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिकमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण दिले गेले होते. त्यामुळे 7 जागा ओबीसी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत या वेळी एकूण नगरसेवक संख्या 2 ने वाढूनही ओबीसींसाठीच्या एकूण 4 जागा कमी झाल्या आहेत.
एससी (अनुसूचित जाती) आणि एसटी (अनुसूचित जमाती) साठी आरक्षित झालेले प्रभाग वगळून इतर 7 प्रभागांसाठी चिठ्ठ्या टाकून त्यातील तीन प्रभाग आरक्षित केले जाणार आहेत. याशिवाय या आरक्षण संबंधित हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत.