लॉकडाऊनमध्ये जॉब गमावला, जिद्द नाही; दाम्पत्याने ‘अशी’ केली बेरोजगारीवर मात

वाचा बेरोजगारीवर मात करणाऱ्या या दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी

कोरोना विषाणू संकटाने संपूर्ण जगाच्या आर्थिक चक्राला ब्रेक लावला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमध्ये अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. असं असलं तरी प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाणाऱ्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यातूनही मार्ग काढल्याचं पाहायला मिळतं.

असंच एक उदाहरण आहे दिल्लीतील रोहित आणि रजनी सरदाना या पतिपत्नीचं. सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित कंपनीत काम करणाऱ्या रोहित सरदाना यांच्यावर लॉक डाऊनदरम्यान बेरोजगारीचे संकट ओढवले. घरातील करता माणूसच बेरोजगार झाल्यानं कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता.

रोहित नव्या नौकरीसाठी प्रयत्न करत होते मात्र त्यांना नौकरी काही मिळत नव्हती. अशातच त्यांची पत्नी रजनी यांनी व्यवसाय करण्याची कल्पना सुचवली. रजनी बिर्याणी छान बनवते अशी अनेकांकडून कॉम्प्लिमेंट मिळालेल्या रजनीने आपण बिर्याणी विकूयात लोकांना नक्की आवडेल असा विचार मांडला. रोहित यांना देखील तो पटल्याने त्यांनी अखेर रस्त्यालगत व्हेज बिर्याणी विकण्याचे ठरले.

रोहित व रजनी यांनी आपल्या चारचाकी गाडीचा वापर करत रस्त्यालगत बिर्याणी विकण्याचा नवा व्यवसाय सुरु केला. आता त्यांच्या बिर्याणीला लोकांचीही पसंती मिळू लागली असून अनेकजण आवर्जून त्यांच्याकडे बिर्याणी खाण्यासाठी येतात असं रोहित यांनी ब्रूट इंडियाशी बोलताना सांगितलं.

आपण लावलेल्या व्यवसायाच्या रोपट्याला कष्टाचं खत घालून त्याच डेरेदार झाड करण्यासाठी रजनी आणि रोहित दोघेही अहोरात्र झटतात. बेरोजगारीने कंबरडं मोडलं तरी पुन्हा उठून उभं राहण्याची जिद्द दाखवणाऱ्या रोहित आणि रजनी या जोडप्याच्या जिद्दीला सलामच. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.