म्हासुर्णे -खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. परिसरात दीड हजार एकर क्षेत्रात 1533, एफसी3 व ज्योती या वाणांच्या बियाणांची लागवड करण्यात आली आहे; परंतु बटाटा कवडीमोल किमतीला विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
बटाट्याची बियाणे प्रतिक्विंटल 3200 रुपयांप्रमाणे खरेदी करून, लागवडीसाठी शेतकऱ्यांनी एकरी 30 ते 35 हजार रुपये खर्च केले. पुसेसावळी, चोराडे, वडगाव, होळीचागाव, रहाटणी, शेनवडी, उंचीठाणे, पळशी, लाडेगाव, वांझोळी, म्हासुर्णे, पारगाव येथील शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली होती.
आता बटाटा काढणीला वेग आला असून, कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बटाट्याला योग्य मोबदला मिळण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
आमच्या गावात शंभर-दीडशे एकरात बटाट्याची लागवड झाली आहे. अनेक शेतकर्यांनी बॅंकांकडून कर्जे घेऊन बियाणे खरेदी केली आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
बापूराव पिसाळ , शेतकरी