लाॅकडाऊनमुळे आमचे करोडो रूपयांचे नुकसान, आम्हाला नुकसान भरपाई द्या; हाॅटेल व्यावसायिकांची केंद्राकडे मदतीची मागणी

नवी दिल्ली, दि. 16 – कोविडविषयक निर्बंध आणि एकूणच मंदीची स्थिती यामुळे देशभरातील हॉटेल व्यावसायिकांचे सन 20-21 या आर्थिक वर्षात तब्बल 1 लाख 30 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले असून कोविडच्या नव्या लाटेमुळे या व्यावसायिकांचे यापेक्षाही अधिक नुकसान होऊ लागले आहे.

या साऱ्या स्थिती विषयी पंतप्रधान आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे सादरीकरण करण्यात आले असून केंद्राने आम्हाला मदतीचा हात दिला पाहिजे, अशी मागणी या व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे. फेडरेशन ऑफ हॉटेल ऍन्ड रेस्टॉरंट्‌स असोशिएशन या संघटनेने सरकारकडे ही मागणी केली आहे.

या संघटनेने म्हटले आहे की, 19-20 च्या आर्थिक वर्षात हॉटेल व्यावसायिकांचे 1 लाख 82 हजार कोटींचे नुकसान झाले असून त्यानंतरच्या वर्षातील नुकसान 1 लाख 30 हजार कोटी रूपयांचे आहे. चालू आर्थिक वर्षातही हा व्यवसाय आणखनीच डुबण्याची शक्‍यता निर्माण झाली असून चालू आर्थिक वर्षातील नुकसानीचा अंदाजही याही पेक्षा मोठा असेल असे त्यांनी म्हटले आहे.

धंदाच होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक कर्ज आणि त्याच्या हप्त्यांची परतफेड करण्याच्या स्थितीत नाहीत. कर्जावरील व्याजाची रक्‍कमही चक्रवाढ पद्धतीने वाढत आहेत. अशा स्थितीत आम्हाला हप्त्यांवर सवलत जाहीर होण्याची तातडीची गरज आहे असे या संघटनेचे उपाध्यक्ष गुरबक्‍शसिंग कोहली यांनी म्हटले आहे.अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांसाठी स्वतंत्र निर्णय घेऊन त्यांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणीही या संघटनेने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.