रवी लांडगे यांचा घणाघात : पक्षनेते करणार मनधरणी
पिंपरी – स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी ऍड. नितीन लांडगे यांचे नाव भाजपकडून निश्चित झाल्यानंतर नगरसेवक रवी लांडगे यांनी मंगळवारी (दि. 2) तडकाफडकी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा नाट्यानंतर पक्षातंर्गत बंडाळी रोखण्यासाठी भाजपकडून शिष्टाई सुरू झाली आहे. रवी लांडगे यांची मनधरणी करण्यात येणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी स्पष्ट केले आहे.
ऍड. नितीन लांडगे यांचे नाव स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्यानंतर रवी लांडगे यांनी तडकाफडकी महापौर माई ढोरे यांच्याकडे स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला. तसेच याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना रवी लांडगे म्हणाले, मी पक्षासाठी निष्ठेने काम करीत आलो आहे. मला आमदार महेश लांडगे यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो पाळला गेला नाही. पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेत्यांकडून मला डावलण्यात आले आहे.
पक्षामध्ये जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी नुकतीच घेतलेली भेट ही खासगी होती. त्याचा या घटनाक्रमाशी संबंध जोडू नये. भाजपचे स्थानिक नेते आणि वरिष्ठांनी माझी दखल घ्यायला हवी होती.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा दिलेला राजीनामा लक्षात घेता त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करु. वरिष्ठांकडून जे नाव आले त्यानुसार आज अर्ज भरण्यात आला. त्यामुळे रवी लांडगे यांना समजावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अध्यक्ष पदासाठी 10 इच्छुक असले तरी प्रत्येकालाच संधी मिळेल, असे नसते. एकालाच संधी दिली जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अध्यक्ष पदासाठी आकडेमोड करू नये. भाजपचाच अध्यक्ष होईल.