सातारा – कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेले सातारा पालिकेचे 212 कोटी 19 लाख 72 हजार 361 रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी विशेष सभेत मंजूर करण्यात आले. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात वॉर्ड फंड आणि सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी व भाजप या तिन्ही आघाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या मूलभूत सेवा तोट्यात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या अंदाजपत्रकात मोठ्या विकासकामांसाठी तरतुदी, नव्याने काढण्यात आलेली कर्जे यांचा उहापोह करण्यात आला आहे. त्याच वेळी पालिकेच्या महसुली सेवा तोट्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल हिम्मत पाटील यांनी केले तर तरतुदींचा आढावा उपनगराध्यक्षांनी घेतला.
उत्पन्नाचा विचार करता मालमत्ता कर 13 कोटी 75 लाख, पाणीपट्टी पाच कोटी 50 लाख, इमारत व जागा भाडे दोन कोटी, विशेष शिक्षण कर 55 लाख, विकास कर दीड कोटी, वृक्ष कर 45 लाख रुपये, बांधकाम प्रीमियम दोन कोटी, हातगाडा परवाना फी 25 लाख, नक्कल फी 15 लाख, शाहू कला मंदिर भाडे 12 लाख, घरपट्टी विलंब आकार साडेचार कोटी, गुंतवणुकीवरील व्याज एक कोटी 75 लाख यांचा अंदाजपत्रकात समावेश आहे.
मात्र, उत्पन्नाच्या 29 लेखाशीर्षांचा विचार करता पालिकेला मिळणारे सहाय्यक अनुदान 29 कोटी 50 लाख रुपयांचे आहे. म्हणजेच पालिकेची महसुली जमा मालमत्ता कराच्या तुलनेत निम्म्याने कमी असल्याचे दिसून आले आहे.
अंदाजपत्रकात खर्चाच्या बाजूचा विचार करता कर्मचारी वेतन 19 कोटी 51 लाख 85 हजार रुपये, निवृत्तीवेतन 15 कोटी 10 लाख, शिक्षण मंडळ अंशदान दोन कोटी 98 लाख, कर्ज परतफेड 45 लाख, क्रीडा धोरण 30 लाख, वृक्षारोपण वीस लाख, उद्याने देखभाल दोन कोटी 24 लाख, रस्ते, नालेसफाई एक कोटी 40 लाख, पाणी पुरवठा देखभाल, दुरुस्ती एक कोटी 85 लाख, पाणी बिले दीड कोटी, इमारत देखभाल एक कोटी 85 लाख, रस्ते दुरुस्ती एक कोटी, कास धरण उंची वाढविणे 12 कोटी 78 लाख, नवीन रस्ते सात कोटी 75 लाख, एलईडी दिवे बसवणे एक कोटी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पाच लाख, शाहू कला मंदिर सुधारणा 50 लाख अशा तरतुदी आहेत.
आस्थापना, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्यावे लागणारे निवृत्तीवेतन, मोठ्या विकासकामांच्या तरतुदींसाठी पालिकेच्या तिजोरीवर 51 कोटी 29 लाख रुपयांचा बोजा पडला आहे. भांडवली जमेच्या तुलनेत खर्च तिप्पट वाढल्याने पालिकेच्या खर्चावर मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले आहे.
असा जाणार रुपया
प्रशासकीय खर्च 62 पैसे
विकासकामे 22 पैसे
मालमत्ता दुरुस्ती 4 पैसे
आरोग्य व सुविधा 4 पैसे
असाधारण खर्च 5 पैसे
शिक्षण 2 पैसे
पाणी पुरवठा 1 पैसा
असा येणार रुपया
विशेष अनुदाने 49 पैसे
महसुली अनुदाने 20 पैसे
नगरपालिका दर व कर 10 पैसे
डिपॉझिट 7 पैसे
फीपासून उत्पन्न 7 पैसे
व्याज व विलंब आकार 4 पैसे
इतर उत्पन्न 2 पैसे
कर्जे 1 पैसा