गोरखपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीच्या हाताळणीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोंडभरून प्रशंसा केली. त्याशिवाय, योगींची तुलना भगवान कृष्णांशी केली. उत्तरप्रदेशातील विविध रस्ते प्रकल्प बांधणीचा प्रारंभ सोमवारी गडकरी आणि योगींच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी गडकरी यांनी पत्नीशी झालेल्या संवादाचा संदर्भ दिला.
उत्तरप्रदेशात काय चालले आहे अशी विचारणा पत्नीने केली. त्यावर गुन्हे रोखण्यासाठी योगी सरकारकडून उचलल्या जात असलेल्या पाऊलांची माहिती मी दिली. त्यानंतर पत्नीने अन्याय-अत्याचार वाढल्यावर अवतार घेणार असल्याचे भगवान कृष्णांनी म्हटल्याचे नमूद केले. भगवान कृष्णांनी दुर्जनांचा नाश केला. योगीही तशाच पद्धतीचे कार्य करत आहेत.
ते सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, समाजाच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलत आहेत, असे गडकरी म्हणाले. उत्तरप्रदेशात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी धडक पाऊले उचलली जात आहेत. माफियांच्या अवैध मालमत्ता बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या जात आहेत. त्यामुळे योगींचा उल्लेख बुलडोझर बाबा या नावानेही केला जाऊ लागला आहे.