पिंपरी (प्रतिनिधी) – ‘करोना’च्या काळातही शहरात वाहन तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. पिंपळे सौदागर येथील पोलीस चौकीजवळच चार जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करीत लुटमार केली.
सिकंदर सलीम मुंडे (वय 35, रा. गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी शुक्रवारी (दि. 22) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मस्क्या व इतर जण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास फिर्यादी मुंडे हे आपल्या मोटारीतून चालले होते.
ते पिंपळे सौदागर येथील पोलीस चौकीच्या जवळ आले असताना 18 ते 22 वयोगटातील चार आरोपींनी फिर्यादी यांची मोटार त्यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर लोखंडी रॉडसारख्या हत्याराने त्यांच्या वाहनाची काच फोडली. त्यानंतर पिंपळे सौदागर पोलीस चौकीच्या मागील रस्त्यावरील चारचाकी वाहन व तीन चाकी टेम्पोची तोडफोड केली.
चार दिवसांपूर्वी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने अशाच प्रकारे 13 वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली होती. लॉकडाऊनच्या काळात तोडफोडीचे सत्र थांबले होते, परंतु दारु विक्रीस परवानगी मिळताच शहरात पुन्हा एकदा मारामाऱ्या आणि वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण आहे.