ट्रॅव्हल्स बसेसकडून प्रवाशांची लूट

पुणे – गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. मात्र, अनेकांनी आगाऊ आरक्षण न केल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. संगमवाडी चौकातून विदर्भ, मराठवाड्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स बसेसची गर्दी असते. मात्र, गौरी-गणपतीच्या सणाला जाणाऱ्या प्रवाशांकडून अनेक खासगी वाहनचालक दुप्पट-तिप्पट पैसे आकारत असल्याचे दिसून आले आहे.

रेल्वे, एस.टी.चे आरक्षण फुल्ल झाल्याने नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणजे खासगी वाहने उपलब्ध आहेत. यामुळे, नागरिकांची संगमवाडी येथे गर्दी होत आहे. संगमवाडी चौकातून नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, नाशिक, जळगाव यासह इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध असतात. परंतु, गौरी-गणपती या सणाला गावी जाणाऱ्या नागरिकांचा गैरफायदा घेत खासगी वाहनचालक प्रवाशांची लूट करत आहेत.

संगमवाडी येथून परभणीला जाण्यासाठी सुमारे 500 रुपयापर्यंत तिकीट आहे. मात्र, गणपती व दिवाळी या सणासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची खासगी बसचालक दुप्पट-तिप्पट दर आकारतात. यामुळे प्रवाशांना पर्याय नसल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे, ऍड. विलास राऊत या प्रवाशांनी सांगितले.

वाहनधारक, ट्रॅव्हल्सकडून नियमांना बगल
संगमवाडी चौकात प्रवाशांसाठी खासगी वाहने उभे राहण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, बहुतांशी गाड्या रस्त्यावरच उभ्या असल्याचे दिसून येते. यामुळे रात्रीच्या सुमारास अनेकदा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यातच भर म्हणजे खासगी वाहने रस्त्यातच थांबून प्रवासी घेत असल्याने वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे इतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.