नवी दिल्ली – ट्रॅक्टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झालेल्या शेतकरी नेत्यांविरोधात गुरूवारी दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या. दरम्यान, लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तसेच, त्या हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धू या पंजाबी अभिनेत्याविरोधातही गुन्हा नोंदवला.
केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केलेल्या ट्रॅक्टर संचलनाला हिंसक वळण लागले. त्या हिंसाचारात एक आंदोलक मृत्युमुखी पडला, तर 394 पोलीस जखमी झाले. काही समाजकंटकांनी लाल किल्ल्यात तोडफोड केली. त्यानंतर हिंसाचाराबद्दल पोलिसांनी 37 शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले.
त्यामध्ये राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकर, दर्शन पाल, सतनामसिंग पन्नू आदींचा समावेश आहे. आता त्या शेतकरी नेत्यांविरोधात लुकआऊट नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. ट्रॅक्टर संचलनाला परवानगी देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यांचे पालन न केल्याबद्दल आपल्यावर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करत पोलिसांनी शेतकरी नेत्यांकडून तीन दिवसांत उत्तर मागवले आहे.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सद्भावना रॅली काढली. तर, त्याच भागात स्थानिक रहिवासी म्हणवणाऱ्यांनी हिंसाचार विचारात घेऊन संबंधित भागातून आंदोलकांना हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका रूग्णालयाला भेट देऊन हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली.