पुणे – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी करणार आहेत. दरम्यान, या कामाला उशीर होत असल्याने, गडकरी झडती घेणार असल्याची शक्यता असून, अधिकाऱ्यांची मात्र धांदल उडाली आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर, गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाअभावी काम रखडले होते. त्याबाबत गडकरी यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर ते पहिल्यांदाच या कामास भेट देत आहेत.
पुलाचे 99.5 टक्के भूसंपादन झाले आहे. त्यामुळे या कामाने गती घेतली असून आढावा घेण्यासाठीच ही भेट असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाची पाहणी करावी, अशी विनंती महापौर मोहोळ यांनी पत्राद्वारे केली होती.
महापौर मोहोळ म्हणाले, राष्ट्रीय राजमार्ग क्र. 4 वरील चांदणी चौकातील रस्त्याचे एकात्मिक विकसनाबाबत एन.सी.सी या एजन्सीची नियुक्ती दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली होती. या कामाला आता गती मिळाली आहे. भूसंपादनासाठी 185. 43 रुपये कोटी निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.