मुंबई : स्त्रियांच्या होणाऱ्या विनयभंगावर न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात एक निर्णय देत एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावे लागते. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे अशा पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गाने धडा शिकवता येतो, हेच या निकालाने स्पष्ट केले आहे.
एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला छळत असलेल्याचा आरोप ठेवत साल 2017 मध्ये या आरोपीला अटक केली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या नजरेत येण्यासाठी सतत तिच्या घरासमोरील बगीच्यात बसून ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. एकदा ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा तिथेही या रोड रोमिओने तिथेही तिची पाठ सोडली नाही. तेव्हा मामाने आपल्या मित्रांनी मदतीने या रोड रोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या खटल्यात एकूण 6 साक्षीदारांनी कोर्टात दिलेल्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या रोड रोमिओला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.