कर्नाटकात बोम्मई यांची निवड करताना ज्या घराणेशाहीला भाजप विरोध करत आहे ती घराणेशाहीच कायम ठेवली आहे.
बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र. येडियुरप्पा आणि बसवराज दोघेही कर्नाटकातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि लोकसंख्येच्या 20 टक्के असलेल्या लिंगायत समाजाचे. अर्थात, भाजपने एका लिंगायत समाजाच्या नेत्याला बदलून दुसऱ्या लिंगायत नेत्यालाच आणण्याचे राजकारण खेळले आहे. पण हे करताना दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यालाच प्रमुख पद देऊन आपल्या पक्षातील जुन्या नेत्यांवर अन्याय केला आहे.
बोम्मई यांची निवड करताना ज्या घराणेशाहीला भाजप विरोध करत आहे ती घराणेशाहीच कायम ठेवली आहे. अशीच घराणेशाही कायम राखण्यास भाजपने हरियाणात मदत केली आहे दुष्यंत चौटाला यांना. देवीलाल यांचे पणतू भाजपच्या साह्याने आज उपमुख्यमंत्री आहेत.
आपल्या पक्षातील 75 वर्षांच्यावरील लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, बाबूलाल गौर यांच्यासह अनेक नेत्यांना सक्तीने सेवानिवृत्त होण्यास भाग पाडणारी मोदी-शहा ही जोडी येडियुरप्पा यांच्याबाबतीत बरीच “सॉफ्ट’ राहिली. त्याचं कारण होतं मुख्यत्वे येडियुरप्पा यांनी भाजपला दक्षिणेत सत्तेचा दरवाजा उघडून दिला.
येडियुरप्पा यांची मुलगी, जावई, मुलगा यांच्यावर भ्रष्टाचाराचे, जमीन हडपण्याचे आरोप झाले तरीही पक्ष त्यांना संरक्षण देत राहिला. हे आरोप गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्यावरही झाले होते. पण त्यांचे वय 75 वर्षे झाले म्हणून हटविण्यात आले आणि लगेच मध्य प्रदेश आणि आता उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी बसविण्यात आले. येडियुरप्पा यांचं तसंच पुनर्वसन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मुख्यमंत्री पदावर अनुक्रमे तीन आणि दोन वर्षांसाठी बसण्याआधी “ऑपरेशन लोट्स’च्या साह्याने दोन वेळा मिळून पंचवीसहून अधिक विरोधी आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आणले गेले.
यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला जातो. ऑपरेशन लोट्सची सुरुवात 2018 साली कर्नाटकपासून झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. अर्थात, राजीनामा देण्याआधी खास प्लेनने दिल्लीत जाऊन शिमोग्याचा खासदार असलेल्या आपल्या मुलाला बी. एस. राघवेंद्र यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण मोदी-शहा यांनी त्यांचं म्हणणं मानलं नाही. मुलाऐवजी त्यांनी शोभा करंदलाजे यांचा कृषिराज्यमंत्री म्हणून समावेश केला. “शोभाक्का’ म्हणून कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या या महिला येडियुरप्पा यांच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे मुलगा नाही तरी येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयालाच मोदींनी मंत्रिमंडळात घेतलं.
लिंगायत समाज हा एकूण लोकसंख्येच्या सुमारे 20 टक्के तर वोक्काळीग समाज एकूण लोकसंख्येच्या सुमारे 18 टक्के प्रमाणात कर्नाटकात आहे. देवेगौडा वोक्काळीग समाजाचे. त्यामुळे कर्नाटकात सत्तांतर घडवताना जात, परिवारवाद आणि ज्येष्ठता या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. कर्नाटकात आतापर्यंत दोन पिता-पुत्र मुख्यमंत्री झाले. देवेगौडा-कुमारस्वामी आणि एस. आर. बोम्मई आणि बसवराज बोम्मई. संपूर्ण देशात आतापर्यंत 15 राजकीय परिवाराने दोन किंवा त्याहून अधिक मुख्यमंत्री दिले आहेत, तर काही ठिकाणी मुलांना उपमुख्यमंत्री पद मिळालं.
जम्मू-काश्मीरच्या अब्दुल्ला परिवाराने आतापर्यंत तीन मुख्यमंत्री दिले. याबरोबरच मुलायसिंग-अखिलेश (उत्तर प्रदेश), लालूप्रसाद-राबडी देवी-तेजस्वी (बिहार), शंकरराव-अशोक चव्हाण (महाराष्ट्र), रवीशंकर-शामा चरण शुक्ल (मध्य प्रदेश), प्रकाशसिंग-सुखबिरसिंग बादल (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पंजाब), बिजू-नवीन पटनायक (ओडिशा), करुणानिधी-एम. के. स्टॅलिन (तमिळनाडू), वाय. एस. आर. रेड्डी-जगनमोहन रेड्डी (आंध्र-तेलंगणा), शिबू-हेमंत सोरेन (झारखंड), दोरजी-प्रेमा खंडू (अरुणाचल प्रदेश), पी. ए.-कोनराड
संगमा (मेघालय), हे ते पिता-पुत्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, असो!
भाजपने याआधीही मुख्यमंत्री बदल केला आहे. दिल्लीत मदनलाल खुराणा यांना बदलणे पक्षाला फायदेशीर ठरले नाही तर मध्य प्रदेशात आडवाणी यांच्यासह कैलाश जोशी, सुंदरलाल पटवा, उमा भारती यांच्या जागी प्रथम बाबूलाल गौर नंतर शिवराजसिंग चौहान आले. गुजरातमध्ये केशुभाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदी आले. खुराणा आणि पटेल दोघांनीही हायकमांडकडे आपली नाराजी नोंदविली होती.
सध्या छत्तीसगडचे 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंग आणि मध्य प्रदेशचे 14 वर्षे मुख्यमंत्री असलेले शिवराजसिंग चौहान हे नरेंद्र मोदींच्या खालोखाल ज्येष्ठ असलेले 62 वर्षीय शिवराजसिंग, तर 68 वर्षांचे रमणसिंग आहेत. चौहान आणि मोदी यांचे संबंध फार चांगले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर मोदी-शहा आपलं लक्ष मध्य प्रदेशावर केंद्रित करू शकतात. त्याजागी कदाचित शहा यांचे विश्वासू आणि पक्षाचे महासचिव कैलास विजयवर्गीय किंवा ओम बिर्लाप्रमाणे एखाद्या “सरप्राइज’ नावाची वर्णी लागू शकते.