कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर नजर

नगर  – कांद्याच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता पुरवठा विभागाने तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात जवळपास 40 ते 50 कांदा व्यापाऱ्यांकडे पथकामार्फत तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागातून याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, या तपासणीत फारसे काही आढळून आले नाही.

ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढत आहे. बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बाजारात येणारा नवीन कांदा हा भिजलेल्या, कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यास दरदेखील मिळत नाही, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा साठवणुकीची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहायक पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे यांचा पथकाने कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी केली. सरकारच्या निर्देशानुसार मोठ्या व्यापाऱ्यांना 500 क्विंटल तर छोट्या व्यापाऱ्यांना 100 क्विंटल कांदा साठवणुकीची परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त कांद्याची साठवणूक केली नाही, याची तपासणी पथकाकडून करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.