मतदानावर “सूक्ष्म’ निरीक्षकांची करडी नजर

123 निरीक्षकांची नियुक्‍ती ः मावळ, शिरूरच्या संवेदनशील केंद्रावर विशेष नजर

पिंपरी
– मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दि. 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर 123 सूक्ष्म निरीक्षक नियुक्‍त करण्यात आले असून ते केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली कार्यरत राहणार आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून ते मतपेट्या सील होईपर्यंत सूक्ष्म निरीक्षकांची मतदान केंद्रावर नजर असणार आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघासाठी यावेळी अत्यंत चुरशीची लढत होत आहे. तुल्यबळ लढती होत असल्याने उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक विभागही लक्ष ठेऊन आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दोन्ही मतदारसंघात असलेल्या संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने मोठी तयारी करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामधील 73 संवेदनशील मतदान केंद्रे तर शिरुर लोकसभा मतदार संघामधील 19 संवेदनशील मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सूक्ष्म निरीक्षकांची नजर राहणार आहे.

दोन्ही मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने सूक्ष्म निरीक्षक नियुक्‍त केला आहे. त्यांच्या अधिपत्याखाली इतर सूक्ष्म निरीक्षक काम करणार आहेत. मावळ लोकसभेसाठी 73 केंद्रामध्ये 81 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात 34, चिंचवड विधानसभा मतदारसंघात 25, पिंपरी विधानसभा मतदार संघात 22 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्‍त करण्यात आली आहे. तर शिरुर लोकसभेसठी 19 केंद्रासाठी 42 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यामध्ये शिरुर विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर 5, भोसरी विधानसभा मतदार संघात 15 व हडपसर मतदारसंघात 22 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

या सूक्ष्म निरीक्षकांकडून मतदात केंद्रावर मतदानाच्या दिवशी घडणाऱ्या घडामोडीची पाहणी करून निवडणूक निरीक्षक यांना मतदान संपल्यावर अहवाल सादर करतील. हे सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्याच्या एक तास आधीपासून उपस्थित रहाणार आहेत. मतदान प्रक्रिये दरम्यान होणाऱ्या घडामोडींची माहिती मुख्य सूक्ष्म निरीक्षकांना कळवल्यानंतर थेट दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयोगाकडे ही माहिती सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे, मावळ आणि शिरुर या दोन्हीही मतदारसंघामधील संवेदनशील आणि अति संवेदशनशील मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची करडी नजर राहणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.