वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची वाघोली पोलीस ठाण्यात रोजची चालू असणारी लुडबुड थांबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस आयुक्तांनी लोणीकंद पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना गुन्हे शोध पथकातून काढून टाकण्याची कारवाई काही दिवसापूर्वी केली होती.
मात्र त्यातील एक कर्मचारी वाघोली मधील कायम रहिवासी असल्याने त्याने वाघोली पोलीस ठाणे वेगळे झाल्यानंतर आपला रुबाब कायम ठेवत वाघोली पोलीस ठाण्यात कामकाजात हस्तक्षेप करण्याची लुडबुड कायम ठेवली असून जमिनीच्या जागा ताबा घेणे व इतर कामात हा कर्मचारी मध्यस्थची भूमिका बजावताना दिसून येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलीस आयुक्तांकडून संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हे शोध पथकातून काढण्याची कार्यवाही झाल्यानंतर हा कर्मचारी मोठ्या थाटामाटात गणवेश न घालता दोन्ही पोलीस ठाण्यात रुबाबात कामकाज करत आहे. कर्मचारी स्थानिक असून देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची बदली झाली नसल्याने ही लुडबुड निवडणूक आयोगाची पुढील काळात डोकेदुखी ठरू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कर्मचाऱ्यांची देखील फील्डिंग…
वाघोलीची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन अनेक कर्मचारी वाघोली मध्ये नियुक्ती व्हावी यासाठी मोठी फिल्डिंग लावत असून या मागील आर्थिक हेतू स्पष्ट होताना दिसत आहे. पोलीस ठाण्याची निर्मिती होऊन देखील वाघोली आणि लोणीकंद वेगळे झाल्याचा अनुभव काही पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापही आलेला नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.