कारवाईमध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप
वाघोली- पुणे – नगर महामार्गावर वाघोली येथील केसनंद फाटा येथे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर लोणीकंद पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाईमध्ये ट्रॅव्हल्स चालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
पुणे-नगर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बुकिंग केंद्राचा सुळसुळाट झाला आहे. लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. ट्रॅव्हल्सचालक रस्त्याच्या मध्येच गाडी उभी करून प्रवाशी घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना अन्य वाहनधारकांना व नागरिकांना करावा लागतो. खराडी बायपास, वाघोली येथील केसनंद फाटा येथे सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्स एकच गर्दी करतात. बेशिस्त गाड्या उभ्या करून जास्तीत जास्त महामार्ग व्यापून टाकतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याशिवाय कोंडीचा सामना नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागत आहे.
पुण्याहून नागपूर, औरंगाबाद, बीड, धुळे इंदौर आदी विविध जिल्ह्यांसह इतर राज्यात जाणारा प्रवासीवर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे याचाच फायदा घेत पुणे – नगर महामार्गावर ठिकठिकाणी नियमबाह्य बुकिंग केंद्रांचा सुळसुळाट झाला आहे. महामार्गालगत बुकिंग एजंट टेबल टाकून ठाण मांडून बसलेले असतात. त्याठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे प्रवासी रस्त्यावरच आपले समान व मुलाबाळांसह थांबतात. एकापाठोपाठ येणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे प्रवाशांना धोका पत्करावा लागतो. अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस विभागाकडून अनेकवेळा कारवाई करून ट्रॅव्हल्स चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे लोणीकंद पोलिसांनी दि.20 फेब्रुवारी रोजी खासगी ट्रॅव्हल्ससह, बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात कडक कारवाईची मोहीम सुरु केले आहे.
- लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप
लोणीकंद पोलीस ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करीत असताना कारवाई टाळण्यासाठी ट्रॅव्हल्सचालकांकडून लोकप्रतिनिधींचे स्वीय सहायक, पोलीस अधिकारी यांच्या फोनद्वारे हस्तक्षेप होत असल्याचे दिसून आले. अनेक ट्रॅव्हल्स चालकांनी गाडीतील प्रवाशांना पोलिसांविरोधात भडकवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, वाहतूक शाखेकडून ट्रॅव्हल्सवर कडक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस नाईक जगताप, बी. एस. वाडेकर यांनी कारवाई केली. - रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ट्रॅव्हल्ससह अन्य बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कारवाईमध्ये सातत्य ठेवणार.
– केशव वाबळे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद.