बारामती (प्रतिनिधी) – लोणी भापकर (ता. बारामती) येथे घाटकोपर (मुंबई) येथून आलेल्या 70 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारामतीतील करोना संक्रमितांची संख्या 15 झाली आहे. संक्रमित महिलेच्या संपर्कातील 9 व्यक्तींची कोविड-19 तपासणी करण्यात येणार असून 11 जणांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.
करोना संक्रमित महिला घाटकोपर येथून लोणी भापकर येथे मंगळवारी (दि.19) आली असून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता म्हणून महिलेची करोना चाचणी घेण्यात आली ती पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, मुंबईहून आल्यानंतर या महिलेची कोविड-19 चाचणी बारामतीतील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात करण्यात आली होती.
त्यावेळी या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेचे श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी महिलेला दाखल करण्यात आले. तेथून पुन्हा औंध रुग्णालयात कोविड-19 ची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आला. लोणी भापकर महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.
आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे व कायदा व सुव्यवस्था कामी सहकार्य करावे.
– दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी