दीर्घकालीन उपाययोजना माझ्यासाठी महत्त्वाच्या – सिद्धार्थ शिरोळे

पुणे – तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना माझ्यासाठी महत्त्वाच्या असून हीच माझ्या कामाची पद्धत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. त्याचेच उदाहरण म्हणजे घोले रस्ता आणि दीप बंगला चौकातील वर्तुळाकार वाहतूक व्यवस्था ही एक आहे.

वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नाने गेल्या काही वर्षांत शिवाजीनगर मतदार संघातील या दोन चौकांमध्ये गंभीर स्वरूप धारण केले होते. यामुळे या परिसरातील अपघातांमध्येही वाढ झाली होती. या दोन्ही परिसरातील वाहतुकीचा अभ्यास केला. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून या दोन्ही चौकात वर्तुळाकार वाहतूक व्यवस्था राबवण्यात आणि ती यशस्वी करून दाखवण्यात यश आल्याचे शिरोळे म्हणाले.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील किंवा मतदारसंघातील नागरिक समस्या घेऊन आल्यास त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर भर असेल, असेही शिरोळे यावेळी म्हणाले. डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेली दोन वर्ष नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळताना अशा काही उपाययोजना करण्यात आपण यशस्वी ठरलो, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

आमदार म्हणून निवडून आल्यास माझ्या कार्यक्षेत्रात वाढ होणार असली, तरी समस्येच्या मुळाशी जात ठोस उपाय करण्यावर नेहमी भर असेल, असे सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले. मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी मी निश्‍चित प्रयत्न करीन, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)