विसाव्यावर दर्शनासाठी लांबचलांब रांगा

फुरसुंगी – संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याहुन सासवड मुक्‍कामासाठी शुक्रवारी मार्गस्थ झाला. यावेळी पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या मार्गावर जागोजागी विसाव्यावर दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. संततधार पावसाचा शिडकावा होत असल्याने मोठ्या उत्साहात पावसात भीजत भाविकांनी अवघड असला दिवेघाट लिलया पार केला. दिवसभर सासवडमार्ग भाविकांच्या सागराने डुंबुन निघाला होता.

सर्व सुखाचे आगर ।
माझे माहेर पंढरपूर ।।
तुका म्हणजेहेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।

या तुकाराम महाराजांच्या ओवीची आठवण येथे होते. ती आठवण ठेवूनच कित्येक वर्षांपासून वैष्णवभक्‍त पंढरपूरला जात आहे. ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर जाण्यासाठी कुणाला आमंत्रण दिले जात नाही, त्याची जाहिरातही केली जात नाही.तरी तमाम वैष्णवभक्‍त बरोबर वेळेत देहू-आळंदीला पोहोचण्यासाठी निघाला आहे. खांद्यावर भगव्या पताका, डोक्‍यावर तुळस, गळ्यात वीणा, मृदंग असे रूप धारण केलेला वारकरी आषाढी वारीला पिढ्यानपिढ्या जात आहे.शुक्रवारी सकाळी हडपसरहुन सातववाडी, भेकराईनगर, पॉवर हाऊस, मंतरवाडी, ऊरुळी देवाची,वडकीनाला मार्गे हा सोहळा दिवेघाटमार्गे दुपारी साडेतीनच्या दरम्यान सासवड मुक्‍कामासाठी मार्गस्थ झाला.

या पालखी सोहळ्यात अनेक सामाजिक, राजकीय कार्यकेर्ते, सेवाभावीसंस्थांनी आपापल्यापरीने फराळ वाटप, औषधोपचार, साहित्यवाटप करून वारकऱ्यांची सेवा करत होते.फुरसुंगी येथे ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. जागोजागी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. उरुळीदेवाची फाट्यावर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार व फारळवाटप करण्यात आला. वडकी येथील विसाव्यावर दुपारी अडीचच्या दरम्यान पालखी सोहळा येऊन विसावला. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. या ठीकाणी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर सासवड मार्ग वैष्णवांच्या मेळ्यात भक्‍तीमय झालेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.