आयटीसी लिमिटेड ही 50 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेली भारतातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची वार्षिक विक्री सुमारे 10.8 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू (एफएमसीजी), हॉटेल्स, पॅकेजिंग, पेपरबोर्डस् अँड स्पेशालिटी पेपर्स, कृषीउद्योग अशा विविध क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. कंपनीचा व्यवसाय आणि साखळी उद्योग यावर आजच्या घडीला सुमारे 60 लाख लोकांचा चरितार्थ अवलंबून आहे.
भारतातील या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय कोलकत्यात आहे. या कंपनीची स्थापना 1910 मध्ये झाली. त्यावेळी कंपनीचे नाव इम्पिरिय टोबॅको कंपनी असे होते. 1970 मध्ये कंपनीचे नाव इंडिया टोबॅको कंपनी लिमिटेड असे करण्यात आले. नंतर फक्त आय. टी. सी. लिमिटेड असे संक्षिप्त करण्यात आले. पुढे मधली टिंब काढून टाकून आयटीसी लिमिटेड असे झाले.
आशियातील 81 टक्के बिडी, सिगारेट आयटीसी विकते. खाद्यपदार्थाच्या क्षेत्रातही कंपनी अग्रेसर आहे. आशीर्वाद आटा, बी नॅचरल, सनफिस्ट, कॅंडिमॅन, बिंगो, यिप्पी हे या क्षेत्रातील कंपनीचे प्रमुख ब्रॅंड आहेत. स्नॅक्स, रेडी-टू-इट मील्स, फऴांचे रस, दुग्ध उत्पादने आणि गोळ्या-बिस्कीटांचे उत्पादन आणि विक्री कंपनी करते.
वैयक्तिक वापराच्या वस्तूंमध्ये परफ्यूम्स, हेअरकेअर आणि स्किनकेअर उत्पादने बाजारात आणली आहेत. तसेच स्टेशनरीमध्ये क्लासमेट, पेपरक्राफ्ट आणि कलर क्रू हे ब्रॅंड प्रसिद्ध आहेत. 2003 मध्ये कंपनीने क्लासमेट ब्रॅंडखाली वह्या बाजारात आणल्या. आज हा क्लासमेट बाजारातील आघाडीचा ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. मंगलदीप अगरबत्ती, शिप काडेपेट्या बाजारात ठळकपणे दिसतात.
कंपनीच्या आयटीसी हॉटेल्स डिव्हिजन देशभरात शंभराहून अधिक हॉटेल्स आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयटीसी इन्फोटेक इंडिया लिमिटेड कार्यरत आहे. अशा या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि भक्कम पायावर उभ्या असलेल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला लाभ पदरात पडू शकतो.
ग्राहक खरेदी क्षमता सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह माहिती गुणवत्तापूर्ण नसल्याचे सांगून ग्राहक क्रय सर्वेक्षणाचे (कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्वे) निष्कर्ष रोखून धरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे (एनएसएस) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होत असल्याचे दिसून आले आहे. माध्यमांमध्ये यासंदर्भातील माहिती जाहीर झाली आहे.
मात्र या सर्वेक्षणातील निष्कर्ष परस्परविरोधी असल्याचे सांगून सरकारने ही माहिती रोखून धरण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे प्रकरण अनेक शिफारशींसह तज्ञांच्या समितीकडे सोपवण्यात आले असून त्यामध्ये सर्वेक्षणाच्या पद्धतीतील अचूकता, आकडेवारीच्या गुणवत्तेत सुधारणा अशा बाबींचा समावेश आहे.
फ्युचर लाईफ स्टाईलमध्ये गुंतवणूक गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या ब्लॅकस्टोन या खासगी इक्विटी फर्मने किशोर बियाणी यांच्या फ्युचर लाईफ स्टाईल फॅशन्स (एफएलएफएल) या कंपनीत 750 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिबेंचरच्या स्वरुपातील ही गुंतवणूक एफएलएफएलची होल्डिंग कंपनी रायका कमर्शियल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच ब्लॅकस्टोन ही रायकामध्ये वित्तीय भागीदार असेल.
31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एफएलएफएलची उलाढाल 5728 कोटी रुपये होती तर नफा 189 कोटी रुपये होता. कंपनीच्या अन्य व्हॅल्यू ऍडेड गुंतवणूकदारांमध्ये कॅटरटन, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट यांचा समावेश होतो. एफएलएफएलकडे ली कूपर, इंडिगो नेशन, जेलस21, बेअर, ऑल, अशा तीस फॅशन ब्रॅंडचा पोर्टफोलिओ असून त्यांची देशभरात 346 स्टोअर आहेत.
ऑक्टोबर महिन्यात निर्यातीत घट देशातून होणाऱ्या निर्यातीत सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत ऑक्टोबर 2019 मध्ये निर्यातीत 1.11 टक्के म्हणजेच 26.38 अब्ज डॉलर एवढी घट झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चामड्याच्या वस्तू, रेडीमेड कपड़े, गालीचे आणि कृषी उत्पादनांचा समावेश आहे.
कामगारांची तीव्र गरज असणाऱ्या हिरे आणि दागिने, अभियांत्रिकी उत्पादने, औषधे आणि सामुद्री उत्पादनांच्या क्षेत्रात निर्यातीत किंचित वाढ झाली आहे. त्यावरून आगामी महिन्यांमध्ये या क्षेत्रात मागणी वाढेल असा अंदाज आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीचा विचार केला तर 2018 मध्ये व्यापारातील तूट 116.15 अब्ज डॉलर होती. ती कमी होऊन 2019 मध्ये 94.72 अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजनांमधील निर्यातदारांना मिळणारी सवलतींची रक्कम गेली साडेतीन महिने सरकारकडे अडकून पडली असल्याने निर्यातदारांना पुढील व्यवहार आणि करारात रोखतेची अडचण जाणवत असल्याचे द फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनने (एफआयईओ) म्हटले आहे