टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबलचक रांगा

फास्टॅगचा परिणाम ः नेटवर्कच्या अभावाने फास्टॅग सुविधेचा बोजवारा

खेड शिवापूर- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच महामार्गावरील टोल नाक्‍यांवर फास्टॅगची सुविधा दि. 14च्या मध्यरात्रीपासून सुरू केली; मात्र खेड शिवापूर टोलनाक्‍यावर सकाळपासूनच नेटवर्क कमी असल्याने फास्टॅगच्या लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

शनिवारी (दि. 14) मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या फास्टॅगची सुविधाही खडतर असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. 1 डिसेंबर रोजी सुरू होणारी फास्टॅग सुविधा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित केली होती. ती आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र परिस्थिती खूपच वेगळी होती. फास्टॅगमधून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर फास्टॅगची चिप असूनसुद्धा केवळ नेटवर्कच्या अडचणीमुळे वाहन चालकांना टोल रोख भरावा लागत होता.

एका गाडीला पाच पाच मिनिट लागत होते. त्यामुळे वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या. त्यामुळे फास्टॅग असूनही अनेक वाहनांकडून टोल रोख घेतला जात होता. तसेच जी वाहने टोलमुक्त आहेत त्यांचे काय करायचे, या बाबतीत टोल कर्मचारी व टोल प्रशासनाने काहीही ठोस भूमिका घेतली नसल्याने वाहनचालक व कर्मचारी यांच्यात वाद विवाद होत होते. त्यामुळे वाहननांच्या रांगा वाढत होत्या. सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी 10 लेनपैकी 5 लेनवर रोख व 5 लेनवर फास्टॅग अशी टोल वसुली सुरू केली; पण त्याचा फारसा फरक पडताना दिसत नव्हता. वाहन चालक म्हणाले की, आम्ही फास्टॅग काढूनही आम्हाला किमान अर्धा तास उशीर होत आहे. त्यामुळे फास्टॅग वैगेरे हे निव्वळ थोतांड असल्याचे प्रवाशांकडून ऐकायला मिळत होते.

  • पाच लेन फास्टॅगसाठी
    टोल प्रशासनाने सांगितल की, आम्ही पाच लेन ह्या फास्टॅगसाठी केल्या आहेत. तर इतर वाहनांसाठी पाच लेन आहेत. मात्र बऱ्याच वाहन चालकांच्या खात्यात बाकी नसल्याने अडचण येत आहे. रविवार असल्याने वाहने मोठ्या संख्येने आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने फास्टॅगला अडचणी येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.