नवी दिल्ली : मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या राजीमान्यावर कॉंग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. राजीनामा देण्यास मोठा विलंब झाल्याचे त्या पक्षाने म्हटले.
मणिपूरमधील घडामोडीवर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिल्या. तब्बल २१ महिने मणिपूर जळत राहिले. मात्र, राजधर्माचे पालन झाले नाही, अशा शब्दांत खर्गे यांनी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपला लक्ष्य केले.
कॉंग्रेसने अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली. त्याशिवाय, जनतेचा वाढता दबाव आणि सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आदींमुळे सिंह यांना राजीनामा देणे भाग पडले. जवळपास दोन वर्षे सिंह यांनी मणिपूरमध्ये विभाजन घडू दिले. त्या राज्यात हिंसाचार, जीवितहानी घडूनही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदावर कायम ठेवले.
मोदींनी एकदा तरी मणिपूरला भेट द्यावी. तेथील जनतेचे म्हणणे ऐकावे, अशी भूमिका राहुल यांनी मांडली. मोदी आता फ्रान्स आणि अमेरिकेला जाणार आहेत. मणिपूरची जनता आता मोदींच्या भेटीची प्रतीक्षा करत आहे, अशी उपरोधिक टिप्पणी रमेश यांनी केली.