लॉंग कोविड – रुग्णांची संख्या कमी परंतु चिंता वाढवणारी

पुणे – करोना, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याची लक्षणे, ऑक्सिजन लेव्हल, व्हेन्टिलेटर या सगळ्याच्या पलिकडे जाऊन “सुटलो करोनातून’ असे अनेकांना म्हणता येत नाही. कारण “लॉंग कोविड’ची लक्षणेही अनेकांमध्ये दिसून आली असून, काही रुग्णांचा 40 ते 45 दिवसांपर्यंत “पॉझिटिव्ह’ अहवाल येऊ लागला आहे. त्याला “लॉंग कोविड’ असे आता म्हटले जात आहे.

 

करोनाने बाधित झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला पाच दिवसांत तर काही रुग्णांना 10-14 व्या दिवशी लक्षणे दिसून येतात. लगेचच चाचणी केल्यास त्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू केली जाऊ शकते. परंतु काही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून, ती बरी झाली तरी ते अनेक दिवस “पॉझिटिव्ह’ असण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बाधित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच पाचपेक्षा जास्त लक्षणे दिसत असतील तर अशा बाधितांमधील 75 टक्के रुग्णांच्या आरोग्यावर ते जास्त परिणाम करणारे आहे. म्हणजेच असे रुग्ण जास्त काळ पॉझिटिव्ह राहू शकतात, असे इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनातून पुढे आले आहे. याशिवाय बाधित रुग्णांचे वय, श्वसन आरोग्य, लिंग आणि वजन यावरही ते अवलंबून असल्याचे या संशोधनातून आलेले निरीक्षण आहे.

 

पुण्यात सात ते आठ टक्के रुग्णांचा अहवाल 40 दिवसांपर्यंत पॉझिटिव्ह असल्याचे सुरूवातीला पहायला मिळत होते. मात्र नंतर रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा त्याच्यातील लक्षणे गेल्यानंतर दुसरी टेस्ट करणे बंद केले. मात्र ज्यांना गंभीर लक्षणे होती, जे ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटरवर होती त्यांची पुन्हा टेस्ट करणे आवश्यक असल्याने त्याच केल्या जात होत्या, अशी माहिती महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

 

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप यांचा सलग 39 दिवस करोना अहवाल “पॉझिटिव्ह’ येत होता. सुरूवातीला तीव्र लक्षणे आणि नंतर त्यातून बाहेर पडल्यानंतरही 11 वेळा अहवाल “पॉझिटिव्ह’ येत असल्याने “करोना कभी ना’ असे म्हणण्याची वेळ आल्याचे जगताप म्हणाले. जरी लक्षणे नसली, जरी शरीरात केवळ पेशी दिसत असले तरी पूर्णत: ते जाईपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून समाजात मिसळणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. करोनाला घाबरु नका पण त्याला सहजही घेऊ नका असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

 

आणखी एका महिलेचा सुमारे 40 दिवस अहवाल पॉझिटिव्हच होता. सुरूवातीला दिसलेली लक्षणे बरी झाली तरी पुन्हा 20 दिवसांनी तीच लक्षणे पुन्हा दिसू लागली. त्यामध्ये सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि अन्य लक्षणे होती. दुसऱ्यांदाही त्याची तीव्रता पहिल्या लक्षणांएवढीच असल्याचे त्या महिलेने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.