लोणावळा – लोणावळा शहरासाठी शनिवारचा दिवस अत्यंत दु:खदायी ठरला. मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. राजकारण आणि समाजकारणातील दोन दिग्गज नेते लोणावळा शहराने शनिवारी (दि. 5) गमावले आहेत. शहरातील ज्येष्ठ नेते आणि पत्रकार दत्तात्रय गवळी यांचे करोनामुळे व माजी नगरसेवक बाळासाहेब कडू यांचे हृदयविकारामुळे शनिवारी निधन झाले.
लोणावळ्याचे माजी उपगराध्यक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रांतिक सदस्य तसेच मावळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय गवळी हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून केवळ लोणावळा शहरातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध होते. लोणावळा शहरातील राजकारणात त्यांच्या शब्दाला मान होता. राजकारणासोबत त्यांची पत्रकारिता क्षेत्रातील वाटचाल देखील खूप मोठी होती.
माजी नगरसेवक बाळासाहेब कडू हे देखील एक अत्यंत उमदं असं व्यक्तिमत्त्व होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांनी जुना खंडाळा विभागातून निवडून येत नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द गाजवली होती. त्यानंतर सध्याच्या पंचवार्षिकमध्ये आपली पत्नी आणि विद्यमान नगरसेविका अंजना कडू यांना निवडून आणून त्यांनी आपली राजकीय ताकत दाखवून दिली होती.