पिंपरी – पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 5) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे सर्वाधिक 83.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. या पावसामुळे भात रोपवाटिकांना दिलासा मिळत असला तरी भातलागवडीकरिता अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतील बहुतांशी भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिपातील बाजरी, तूर, मूग, उडीद, मका या पिकांना दिलासा मिळाला आहे.
पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. शनिवारी शिरूर तालुक्यातील बहुतांशी भागात हलका पाऊस झाला. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील महसूल मंडळात झालेला पाऊस (मिलिमीटर) : मावळ -तळेगाव 30.5, तळेगाव 7.5, काले 36.0, कार्ला 33.6, खडकाळा 38.0, लोणावळा 83.8, शिवणे 6.0. हवेली- भोसरी 8.0, चिंचवड 6.8.
पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज
सलग तीन दिवस बरसल्यानंतर मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र आणखी तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई, कोकणसह पुण्यात व घाटमाथ्यावरदेखील तीन दिवस पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.