स्वच्छ सर्वेक्षण अभियान : उद्या ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा
नगरपरिषदेस सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय मानांकन
लोणावळा – स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत सलग तिन्ही वेळेस राष्ट्रीय मानांकन मिळविले आहे. 20 ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्घतीने या पुरस्काराचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. लोणावळा शहराची आजमितीला लोकसंख्या 57 हजार 698 असून, बाहेरून फिरायला येणाऱ्या पर्यटकांची दैनंदिन सरासरी संख्या 13 हजार 321 इतकी आहे. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला. यापूर्वी 2018 साली लोणावळा नगरपरिषद सातव्या व 2019 साली दुसऱ्या क्रमांकावर होती. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने 163 कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, संस्थांमधील पुरुष, महिला व मुले मिळून 18 हजार 302 जणांनी सहभाग नोंदविला होता.
शौचालय सुविधेच्या बाबतीन 2019 साली लोणावळा नगरपरिषदेला ओडीएफ+ व 2020 साली ओडीएफ++ दर्जा मिळाला आहे. शहरात 40 सार्वजनिक शौचायले असून यापैकी 10 शौचालयांना स्टार दर्जा प्राप्त आहे. या व्यतिरिक्त 524 शौचालयांसाठी अनुदान देण्यात आले होते.
घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नगरपरिषदेने जिपीएस प्रणालीद्वारे वाहनांचे नियोजन केले आहे. 2019 व 2020 या दोन वर्षांत शहराला कचरामुक्त शहरचा 3 स्टार सिटी दर्जा मिळाला आहे. नागरिकांच्या कचऱ्या बाबतच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी हेल्पलाइन नंबर व अँप्लिकेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत 95.37 टक्के तक्रारींची सोडवणूक केली आहे.
लोणावळा शहराला कचरामुक्त व स्वच्छ बनविण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, पत्रकार संघ, नागरिक, हॉटेल, बचतगट, महिला मंडळे यांनी सहभाग घेतला होता. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी शहरवासीयांना आवाहन करत पथनाट्ये सादर केली. कापडी पिशव्या तसेच 15 हजार डस्टबीनचे नागरिकांना वाटप केले. शाळांमध्ये पासबुक योजना, रिक्षांमध्ये डस्टबीन बसविले, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, स्वच्छता मॅरेथॉन, घरगुती पद्घतीने कचऱ्यापासून खत निर्मिती असे विविध उपक्रम राबविले.
यावर्षी लोणावळा शहराला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच पर्यटकांनी मी लोणावळेकर म्हणून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नवनियुक्त मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे.