- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी
लोणावळा – लोणावळा नगरपरिषद मालकीच्या तुंगार्ली धरणाचे मजबुतीकरण करणेकरीता आवश्यक निधी मिळावा तसेच कुणे नाणे मावळ येथील लोणावळा नगरपरिषद मालकीच्या रोपवे व अँम्युझमेंट पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेपर्यंत जाणारा 15 मीटर रुंदीच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकीकरण करून मिळावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या खासगी दौऱ्या दरम्यान शुक्रवारी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर, नगरसेवक श्रीधर पुजारी, सुधीर शिर्के, संजय घोणे, मंदा सोनवणे, रचना सिनकर, विशाल पाडाळे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, उमेश तळेगावकर, आशिष बुटाला आदी उपस्थित होते.
लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटीश कालखंडात तुंगार्ली धरण बांधणेत आलेले आहे. या धरणातील पाणी तुंगार्ली विभागातील नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जाते. दगडी बांधकाम पद्धतीने बांधणेत आलेल्या या धरणाची सध्यस्थितीमध्ये दुरवस्था झालेली आहे. दगडी बांधकामातून पाणी गळती होत असून, पाणी वाया जात आहे. हळूहळू पाणी गळतीचे प्रमाण वाढून धरणाला धोका निर्माण होणेची शक्यता आहे.
याकारणास्तव धरणाचे मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे आणि या कामाकरीता अंदाजित खर्च 20 कोटी रुपये अपेक्षित आहे. हा निधी मंजूर करून देण्याबाबत मंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. याशिवाय लोणावळा नगरपरिषदेला रोपवे व अँम्युझमेंट पार्क करिता शासनाकडून 12 हेक्टर 43 आर इतकी जागा मिळालेली आहे. ही जागा लोणावळा नगरपरिषद पर्यटनाला चालना देणेकरीता विकसित करणार आहे.
या जागेपर्यंत जाणारा पोच रस्ता वाहनांच्या रहदारीसाठी पक्क्या स्वरूपाचा तयार करणे आवश्यक आहे. यासाठी 15 मीटर रुंदीच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकीकरण करून मिळावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.