लोणावळा -तौक्ते चक्रीवादळ येऊन निघून गेले असले तरीही या वादळाच्या प्रभावाने लोणावळा शहरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झाले असून लोणावळेकरांचा चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने ही केवळ सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. मात्र, त्यातच अचानक आलेल्या पावसामुळे छत्री रेनकोट शिवाय घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाली. आधीच करोनामुळे हैराण झालेले असताना पुन्हा पावसात भिजल्याने आजारी नको पडायला म्हणून लोकांना कसरत करावी लागली.
पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होत आहे. लोणावळा शहरात तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो. त्या पार्श्वभूमीवर शेताची तसेच घरांच्या छापरांची पावसाळापूर्व काम करणे याठिकाणी आवश्यक असते. मात्र यासाठी लागणारे साहित्य ज्या हार्डवेअर दुकानातून मिळते, ती दुकाने बंद ठेवल्याने लोकांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांसोबतच हार्डवेअरची दुकाने देखील उघडी ठेवण्यात यावीत, अशी मागणी शेतकरी तसेच नागरिक करीत आहेत.