लोणावळा, दि. 1 (वार्ताहर) -अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे धोरण लोणावळा शहर पोलिसांनी स्वीकारले आहे. मागील तीन दिवसात अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणाऱ्या तब्बल दहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
लोणावळा शहरात बंगले भाड्याने देण्याच्या व्यवसायाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे-मुंबईमधील धनदांडग्यांनी गुंतवणुकीसाठी सेकंड होम म्हणून बांधलेले बंगले आता पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. अनेकजण तर आता केवळ हा व्यवसाय करण्यासाठी बंगले खरेदी करताना दिसतात. केवळ लोणावळा शहराचा विचार केल्यास असे हजारो बंगले आहेत की जे भाडेतत्त्वावर दिले जातात आणि छोटे मोठे ग्रुप असेल तर हॉटेलपेक्षा हे बंगले भाड्याने घेणे पर्यटकांना ही परवडणारे असतात.
याशिवाय हॉटेलपेक्षा या बंगल्यांमधून पर्यटकांना अधिक स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे पूर्वी हॉटेल आणि रिसॉर्टकडे वळणारा पर्यटक खूप मोठ्या संख्येने या बंगल्याकडे वळू लागला आहे. एकीकडे अनेक नियम पायदळी तुडवीत हा व्यवसाय सुरू असताना दुसरीकडे मात्र याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मागील पंधरा दिवसात लोणावळा शहरातील अशा बंगल्यांमध्ये दोन अपघाती मृत्यू झाले. याशिवाय बहुतांश बंगले हे रहिवासी परिसरात असल्याने त्या ठिकाणी येऊन रात्री-अपरात्री धांगडधिंगा करणाऱ्या पर्यटकांमुळे आजूबाजूच्या स्थानिकांना याचा मोठा त्रास होत आहे.
गरपरिषददेखील करणार कारवाई
घरगुती वापरासाठी बांधले गेलेले बंगले व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त होत आहेत. शिवाय अशा बंगल्यांमधून बांधण्यात आलेल्या अनाधिकृत स्विमिंगपूलचा सर्व्हे नगरपरिषदेकडे करण्यात आला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.