अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी लोणावळा नगरपरिषदेला दणका

नगरपरिषदेला हरित लवादाने ठोठावला पाच लाखांचा दंड

लोणावळा –  लोणावळ्यातील भुशी गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकाम केले. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाकडे लोणावळा नगरपालिकेने दुर्लक्ष आणि दिरंगाई केली. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने लोणावळा नगरपरिषदेस पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच जर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आठवडाभरात दंड न भरल्यास पुढील सुनावणीस आणखी पाच लाखांचा दंड आकारण्याचे आदेश हरित लवादाच्या दिल्लीतील प्रिन्सिपल बेंच दिले आहे.

लोणावळ्यातील भुशीगाव येथील सर्व्हे क्रमांक 24 येथे इंद्रायणी नदीपात्रात लोणावळ्यातील व्यवसायिक प्रकाश मिश्रीमल पोरवाल व विभा प्रकाश पोरवाल यांनी भराव ठाकून अनधिकृत बांधकाम करून पाण्याचा प्रवाह वळविला आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश पुजारी व आशिष शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करून दाद मागितली होती. या प्रकरणी लवादाने या जागेची पहाणी व आखणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, तहसीलदार मावळ व लोणावळा नगरपरिषद कार्यकारी अभियंता यांची संयुक्‍त समिती स्थापन करण्याचे निर्देश लवादाने फेब्रुवारीमध्ये दिले होते. तसेच त्रयस्त एजन्सी म्हणून लोणावळा नगरपरिषदेची नियुक्ती करण्यात आली होती.

या समितीने विवादित जागेची एकत्रित पहाणी करून जागेत राडा-रोडा, भराव टाकला आहे का? याची पहाणी करावी. तसेच पूररेषेच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे का? यासंदर्भात महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश लवादाने दिले होते. असे असताना देखील या संदर्भात त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्याबाबतचा अहवाल हा लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे निर्धारित वेळेत सादर करू न शकलो नसून, पुढील तारखेस अहवाल सादर करून बाजू मांडण्यात येणार असल्याचे लोणावळा नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या उत्तराने हरित लवादाचे समाधान न झाल्याने लवादाने लोणावळा नगरपरिषदेला पाच लाखांचा ठोठावला. हा संपूर्ण अहवाल महिन्याभरात सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती एस. पी. वांगडी व के. रामकृष्णन, तज्ज्ञ सदस्य डॉ. नगीन नंदा यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.